मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावर उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी पेपरलेस मोबाइल तिकीट सेवा सुरू केल्याच्या पहिल्या दोन दिवसांत १५ हजार प्रवाशांनी हे अॅप डाऊनलोड केले. सहा महिन्यांपूर्वी रेल्वेकडून मोबाइल तिकीट सेवा (यूटीएस आॅन मोबाइल अॅप) सुरू करण्यात आली. या सेवेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. यात मोबाइलवर तिकीट आल्यानंतरही प्रवाशांना स्थानकात येऊन एटीव्हीएमवर त्याची प्रिंट काढावी लागत होती. त्यामुळे मोबाइल तिकीट सेवेचा फायदा काय, असा सवाल उपस्थित केला जात होता. यात सुधारणा करून त्यात पेपरलेस मोबाइल अनारक्षित तिकीट सेवा बुधवारपासून सुरू करण्यात आली. ज्या प्रवाशांकडे स्मार्ट फोन आहे त्यांनाच या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या अॅपचा वापर करून सुमारे ५०० प्रवाशांनी तिकीट काढल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले. ही संख्या आणखी वाढत जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या अॅपसाठी जीपीएस कव्हरेज आणि जीपीआरएस जोडणी चांगली असणे गरजेचे असल्याचे चंद्रायन यांनी सांगितले. सहा महिन्यांपूर्वी तयार केलेले अॅप व त्यात सुधारणा करत विकसित केलेले अॅप यांना मिळालेला प्रतिसाद पाहता एक लाख प्रवाशांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे.
दोन दिवसांत १५ हजार डाऊनलोड
By admin | Published: July 10, 2015 3:21 AM