लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: डॉक्टरांची संख्या वाढावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू केली जात आहेत. परभणी, धाराशिवसह प्रत्येक जिल्ह्यांत पुढील वर्षात वैद्यकीय महाविद्यालय आणि बॅचेस सुरू होतील, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली. तसेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील विविध १५ हजार पदे आगामी दोन महिन्यांत भरली जातील, असेही ते म्हणाले.
राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘अवयवदान जनजागृती अभियाना’चे उद्घाटन शुक्रवारी महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेत हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेट, हार्निया, अपेंडिक्स आदी आजारांचा समावेश करण्यात येणार आहे, असेही महाजन यांनी सांगितले.
...या जागा भरणार
महाजन म्हणाले, ‘एनएमसी’च्या मानकांनुसार निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची १,४३२ पदे निर्माण करण्यात आली. ‘गट-क’ची ४५०० पदे महिनाभरात भरली जातील. ‘गट-ड’ची ३८७४ पदे ही जिल्हा निवड समितीमार्फत महिनाभरात भरली जाणार आहेत. तर ‘गट-क’ आणि ‘गट-ड’ या संवर्गातील ५,०५६ पदे बाह्यस्त्रोताने भरली जातील.