विश्वास पाटील, कोल्हापूरराज्य सरकारच्या बृहत: आराखड्यानुसार ७८ अनुदानित हायस्कूल्स (माध्यमिक शाळा) सुरू होणार असून त्यासाठी तब्बल दीडशेहून अधिक संस्थांचे प्रस्ताव आल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रस्तावांच्या हरकतींवर ३ जुलैला पुण्यात माध्यमिक शिक्षण संचालकांसमोर सुनावणी होईल.राज्य शासनाने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर अठरा महिन्यांच्या आत शाळा सुरू करण्याचे बंधन असल्याने पुढील वर्षी जूनपासून नव्या शाळा सुरू होतील. त्यात नववी व दहावीचे वर्गही असतील. पाच किलोमीटर परिसरात माध्यमिक शाळांची व्यवस्था नसलेल्या गावांमध्ये हायस्कूल सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. प्रस्तावांची छाननीही झाली आहे. त्यावरील हरकतींवर सुनावणी होत आहे. त्यातून मंजूर झालेल्या संस्थेस हायस्कूल सुरू करण्यास परवानगी मिळेल. हायस्कूल सुरू झाल्यानंतर पुन्हा शिक्षण विभागाकडून तपासणी होईल व त्यानंतर अनुदान देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा लागेल. नवीन हायस्कूलमध्ये एका वर्गात किमान ३० विद्यार्थी हवेत. दोन वर्गांसाठी तीन शिक्षक, मुख्याध्यापक व एक शिपाई अशी पदे भरता येतील. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड, हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील १२ नवीन हायस्कूल्ससाठी २१ संस्थांनी प्रस्ताव दिले आहेत. कोल्हापूरमध्ये सध्या ९१३ हायस्कूल आहेत.
नव्या ७८ हायस्कूल्ससाठी १५० प्रस्ताव !
By admin | Published: June 25, 2015 1:12 AM