महिलांना १५००, तीन सिलिंडर फ्री... एवढा पैसा कुठून येणार? अजित पवारांनी सांगितला सोर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 05:13 PM2024-06-28T17:13:46+5:302024-06-28T17:14:47+5:30
Ajit pawar News: अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला, शेतकरी, युवा यांना खैरात वाटली. हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांनी टीका करत एवढा पैसा कुठून येणार असा सवाल राज्यसरकारवर उपस्थित केला होता.
राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आज अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला, शेतकरी, युवा यांना खैरात वाटली. हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांनी टीका करत एवढा पैसा कुठून येणार असा सवाल राज्यसरकारवर उपस्थित केला. यावर पवारांनी पत्रकार परिषदेत हा पैसा कुठून येणार, कसा येणार याचा हिशेब मांडत, आम्ही काही नवखे नाही असे सांगत विरोधकांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. तसेच शेतकऱ्यांनाही वीज माफी सह अन्य फायदे दिले जाणार आहे. तसेच तरुणांना अप्रेंटीस करत असताना वर्षभर १०००० रुपये दिले जाणार आहेत. अशा अनेक घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या. यावरून विरोधकांनी हा निवडणुकीचा अर्थसंकल्प असल्याचे व या योजना ताप्तुरत्या राबविल्या जाणार असल्याची टीका केली.
यावर अजित पवारांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याची आमची क्षमता असल्याचे म्हणत हा पैसा कुठून येणार याचामार्ग सांगितला. यासाठी जीएसटीतून राज्याला मिळणारा महसूल वापरण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले. दरवर्षी जीएसटीचा महसूल ५० ते ६० हजार कोटींना वाढत आहे. यंदा राज्याला २.२० लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. तसेच केंद्राला जो जीएसटी जातो त्याच्या ५० टक्के जीएसटी राज्यांना परत केला जातो. केंद्राला मिळणाऱ्या एकूण जीएसटीपैकी १६ टक्के वाटा हा आपल्या महाराष्ट्राचा आहे. सुमारे तीन लाख कोटी रुपये केंद्राला जातात त्याच्या निम्मे आपल्याला मिळणार आहेत, असे अजित पवारांनी सांगितले.
याचबरोबर इतर करही आहेत. आजच्या अर्थसंकल्पातील आकडा कमी वाटत असला तरी येत्या सात तारखेला मी पुरवणी मागण्यांद्वारे उर्वरित रक्कम मांडणार असल्याचेही पवार म्हणाले. मुंबई विभागातील पेट्रोल डिझेल दर कमी केल्यावरून अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. या भागातील लोकांची गेल्या काही काळापासून ही मागणी होती. त्यांना उर्वरित राज्यापेक्षा जास्त कर आकारला जात होता. यामुळे हा कर कमी करून राज्यातील दरांच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे, असे पवार म्हणाले.
शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा विचार आमच्या मनात सुरु होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे पवार म्हणाले. तरुणींना राज्य सरकार ५० टक्के फी माफ देत होते. परंतू अर्थिक परिस्थिती नसणाऱ्यांनी चांगले शिक्षण घ्यायचे नाही का, असा सवाल करत अजित पवारांनी या मुलींनाही मदत देत असल्याचे जाहीर केले.