ऑनलाईन लोकमतजामनेर, जि. जळगाव, दि. 17 -जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दोन मुख्याध्यापकांच्या वादात शनिवारी एका मुख्याध्यापकाने कक्षास खाजगी कुलूप लावून ते शाळेत आलेच नाही. या प्रकारात मात्र सकाळ सत्रातील 1500 विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहिले. तर जे मुख्याध्यापक शाळेत आले, त्यांना कक्षाबाहेर बसूनच काम करावे लागले. जामनेर तालुका शिक्षण संस्थेमध्ये संस्थाध्यक्ष व सचिव यांच्यातील वाद पुन्हा सुरू झाल्याने येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक पदावर दोन जणांनी दावा केल्याने दोन जणांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली. या वरुन सुरू असलेल्या वादात मुख्याध्यापक डी.एस. पाटील हे मुख्याध्यापक कक्षास खाजगी कुलूप लावून गेले व शनिवारी ते शाळेत आलेच नाही. या प्रकारात पोषण आहाराचे साहित्य नसल्याने पोषण आहार शिजू शकला नाही व सकाळ सत्रात शाळेत आलेल्या 1500 विद्याथ्र्याना या वादामुळे पोषण आहारापासून वंचित रहावे लागले. शाळेत आलेले दुसरे मुख्याध्यापक बी.आर. वले यांना कक्षास कुलूप असल्याने बाहेरच टेबल-खुर्ची टाकून काम करावे लागले. शाळेतील या वादामुळे विद्यार्थी वेठीस धरले जात असल्याने शिक्षण विभागाने या प्रकाराची दखल घेण्याची मागणी केली जात आहे.
नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याच्या तिसऱ्याच दिवशी शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित रहावे लागले. शिक्षण संस्थांच्या वादाचा फटका विद्याथ्र्याच्या पोषण आहाराला बसला आहे.