मुंबई : लोकल सेवेवरील ताण कमी करण्यासाठी वांद्रे-विरार एलिव्हेटेड (उन्नत)प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी देतानाच, त्याला निधीही प्राप्त करून देण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात १ हजार ५२५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एलिव्हेटेड प्रकल्पालाच समांतर असलेला कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो प्रकल्प आणि एलिव्हेटेड प्रकल्पाला मिळत नसलेली जागा पाहता, चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्प अडकून पडला होता. त्यामुळे हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण करण्याचा निर्णय घेत, प्रथम वांद्रे-विरार एलिव्हेटेड प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. त्यानंतर, वांद्रे ते चर्चगेट प्रकल्प पूर्ण केला जाईल. या प्रकल्पात एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास महामंडळ), रेल्वे व राज्य सरकार भागीदार आहेत. प्रकल्पांचे काम सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर केले जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात वांद्रे-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला मंजुरी देतानाच, त्यासाठी काही निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. जवळपास १ हजार ५१५ कोटी रुपये देण्यात आले असून, हा निधी जमीन संपादनासह रेल्वे मार्गाच्या आखणीसाठीही खर्च केले जातील. प्रकल्प काही ठिकाणी भूमिगत तर काही ठिकाणी एलिव्हेटेड होणार आहे. त्यामुळे या कामात रेल्वे मार्गाची आखणी आणि संरेखन करण्यासाठीही निधी वापरला जाईल. भूसंपादनासाठी जवळपास ७00 ते ८00 कोटी रुपये खर्च येणार असून, त्याच कामासाठी हा निधी वापरला जाईल. या संदर्भात एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी हा रेल्वेकडून उपलब्ध होईल. मंजूर झालेल्या निधीमुळे प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल. (प्रतिनिधी)सहकार्य करार अंतिम टप्प्यातहा प्रकल्प अर्थ आणि त्यानंतर विधी विभागाकडे पाठवण्यात आला होता. प्रकल्पावरील काम अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल आणि राज्य सहकार्य करार होईल. - नितीन करीर, प्रधान सचिव-नगर विकास विभाग
वांद्रे-विरार उन्नत प्रकल्पासाठी १,५२५ कोटी
By admin | Published: February 19, 2017 1:31 AM