अकोला : ‘आयटीआय’मधून कुशल विद्यार्थी घडावेत, तसेच त्यांना प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त कालावधी मिळावा या उद्देशातून राज्यातील १५३ आयटीआय संस्थांमध्ये रात्रपाळी सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी अपेक्षित खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू मुलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आधारवड ठरल्या आहेत. कुशल विद्यार्थी घडविण्यात आयटीआयचा मोलाचा वाटा आहे. ‘आयटीआय’मध्ये दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शिवाय त्यानंतर स्वत:चा उद्योग, व्यवसाय उभारण्यासोबतच औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी या संस्थांमधील विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. ही बाब लक्षात घेता विद्यार्थी ‘आयटीआय’ला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहून अतिशय कमी खर्चात या ठिकाणी कुशल विद्यार्थी घडावेत, या उद्देशातून शासनाने राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये बंद पडलेली रात्रपाळी पुन्हा नव्याने सुुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
१५३ ‘आयटीआय’मध्ये सुरू होणार रात्रपाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 4:49 AM