ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 1 - कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांनी आजपासून पुकारलेल्या संपामध्ये सहभागी होत वर्धेतील दूध उत्पादकांनी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत तब्बल 155 लिटर दूध ओतले.
शेतकऱ्यांचा संप सुरू असेपर्यंत हे दूध फेकण्याचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. राज्यात पुकारलेल्या संपाचा वर्धेत विशेष परिणाम नसला तरी या दूध उत्पादकांनी आपण या संपात सहभागी असल्याचे सांगितले.
वर्धालगतच्या भुगाव, तळेगाव येथील शेतकऱ्यांनी संपामध्ये सहभाग नोंदवला आहे. आंदोलनानंतर दूध उत्पादकांनी विविध मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यातून शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याची मागणीही केली.
(VIDEO : शेतक-यांच्या संपाला हिंसक वळण, वाहनांची तोडफोड)
नाशिक :
निफाड तालुक्यातील नैताळे येथे शेतक-यांनी वाहनांच्या काचा फोडल्या. यामुळे पोलिसांना आंदोलक शेतक-यांवर सौम्य लाठीमार करावा लागला.
शेतकरी संपाला सुरुवात होताच बुधवारी रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी नाशिक-सापुतारा, पिंपळगाव-सापुतारा, नाशिक-बलसाड या गुजरातला जोडणाऱ्या मार्गांवरुन होणारी भाजीपाला दूधफळे यांची वाहतूक अडवली. त्यानंतर आज सकाळपासून सुरू असलेली वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली असून ठिकठिकाणी भाजीपाला व दुधाचे ट्रक अडकून पडले आहेत.
दिंडोरी येथे नाशिक-सापुतारा रस्त्यावरील पालखेड चौफुलीवर शेकडो शेतकरी जमा होत त्यांनी येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. यात दोन दुधाचे टँकर तर सात आठ आंब्याचे ट्रक अडवून ते बाजूला लावण्यास सांगितले. तर आंबे,चिक्कू, नारळ आदी विविध फळे विक्रीस जाणारे जप्त करत ते रस्त्यावर फेकण्यात आले.
रासेगाव, पांडणे, वणी,खेडगाव, पिंप्री अचला आदी ठिकाणी भाजीपाला,फळे , दुधाची वाहने रोखण्यात आली आहेत. लासलगाव येथे दूध टँकर थांबवणा-या 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सांगली :
मिरज-पंढरपूर रस्त्यावर कवठेमहांकाळजवळच्या अथर्व ढाब्याशेजारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या तीन टेम्पोचे टायर फोडले.
कशी ठरली संपाची दिशा?
पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी ३ एप्रिलला ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. ‘किसान क्रांती’ समन्वय समितीने बुधवारी पुणतांब्यात संपाची घोषणा केली. ४०हून अधिक संघटना संपात उतरल्या असल्याचे समन्वय समितीचे धनंजय जाधव, धनंजय धोरडे, जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले. शरद जोशी व रघुनाथ पाटील प्रणीत शेतकरी संघटना, खा. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी व संजीव भोर यांची ‘शिवप्रहार’ संघटना संपात उतरल्या आहेत.
बाजार समित्यांच्या फेडरेशनचे अध्यक्ष माजी आ. दिलीप मोहिते यांनीही बाजार समित्यांच्या वतीने संपाला पाठिंबा जाहीर केला. नेवासा बाजार समितीने बंद जाहीर केला आहे. पुण्यात डॉ. बाबा आढाव यांनी हमाल मापाडी संघटनेचा पाठिंबा जाहीर केला आहे. नगर जिल्ह्याच्या फर्टिलायझर असोसिएशननेही कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
मुंबई, नवी मुंबईचे धान्य कोठार म्हणून मुंबई बाजार समितीची देशभर ओळख आहे. रोज दोन ते अडीच हजार वाहनांमधून कृषीमाल येतो. यामध्ये भाजी मार्केटमध्ये ४०० ते ५०० ट्रक, फळ मार्केटमध्ये २५० ते ३०० ट्रक, कांदा मार्केटमध्ये २०० ते ३५० वाहनांमधून माल येतो.
उर्वरित आवक धान्य व मसाला मार्केटमध्ये होत असते. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या व्यवहारांवर फारसा परिणाम होणार नाही, असे बाजार समितीचे सचिव शिवाजी पहिनकर यांनी सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यातून माल येथे विक्रीसाठी येत असतो. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा थेट परिणाम येथील व्यवसायावर होणार नाही.
भाजी व फळ मार्केटमधील आवकही सुरळीत राहील, असे ते म्हणाले. फळ मार्केटचे व्यापारी संजय पानसरे यांनीही संपाचा परिणाम होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सद्यस्थितीमध्ये चिक्कू, सीताफळ, काही प्रमाणात आंबे वगळता इतर सर्व फळे परराज्यातून येत आहेत. यामुळे मार्केट सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.
भाजी मार्केटमध्ये गुजरात व इतर ठिकाणांवरून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे. गुरुवारी सर्वच व्यापाऱ्यांनी माल मागविला आहे. सातारा, सांगली परिसरात आंदोलनामुळे माल येण्यास विरोध झाल्यास थोडाफार परिणाम होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
शिवसेनेचा पाठिंबा
उद्धव ठाकरे यांनी समन्वय समितीच्या नेत्यांना मुंबईला बोलविले होते. त्यानंतर माजी मंत्री बबनराव घोलप, खा. सदाशिव लोखंडे यांनी पुणतांब्यात येऊन पाठिंबा जाहीर केला.
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त शेतमालाला हमीभाव व कर्जमुक्तीसाठी आंदोलन केले होते. पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद घडवून आणला होता. ११ आॅक्टोबरला बैठक घेणार होते. मात्र सरकार फसवे असल्याचे सिद्ध झाले आहे.