नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त आयोजित शिबिरात केवळ ६ तासांत १५५ जणांनी रक्तदान केले.‘लोकमत’ आणि ‘डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी लोकमत भवनात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूरचे महानगर संघचालक राजेश लोया, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमत ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले. कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी, कुणाच्या तरी आयुष्यात हसू उमलण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे असते, या जाणिवेतूनच रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. एक सामाजिक जाणीव म्हणून लोकमतचे वाचक, कर्मचारी, युवा नेक्स्टचे सदस्य व सखी मंच सदस्यांनी शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार व राजेश लोया यांनी जवाहरलालजी दर्डा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी स्वातंत्र्य सेनानी व माजी आमदार यादवराव देवगडे व ‘लोकमत’च्या संपादकीय व व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अवघ्या सहा तासांत १५५ जणांनी केले रक्तदान
By admin | Published: July 03, 2016 1:55 AM