ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - रेल्वे स्थानकांवर नेहमीच रेल्वेरुळ ओलांडू नका, रेल्वे रुळ ओलांडणे धोकादायक आहे असा स्पीकरवरुन संदेश दिला जात असतो. मात्र अनेकजण या संदेशाकडे दुर्लक्षकरुन जीवाचा धोका पत्करुन रुळ ओलांडतात. मुंबईत गुरुवारी असाच धोका पत्करुन रेल्वे रुळ ओलांडताना १६ जणांचा मृत्यू झाला.
एकाच दिवशी विविध स्थानकांवर रुळ ओलांडताना १६ जणांचा मृत्यू होणे ही चिंता वाढवणारी बाब आहे. गुरुवारी रेल्वे अपघातामध्ये कुर्ला रेल्वे स्थानकात सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला. भारतीय रेल्वेतर्फे सध्या 'हमसफर' सप्ताह सुरु आहे.
रुळ ओलांडताना एकाचदिवशी इतक्या जणांचा मृत्यू झाल्यामुळे रेल्वेकडून प्रवासी जनजागृतीसाठी राबवल्या जाणा-या विविध उपायोजनांबद्दल प्रश्चचिन्ह निर्माण केलं आहे. अनेकांना कार्यालयं गाठण्याची किंवा घरी जाण्याची घाई असते.
अशावेळी अनेक जण पुलांचा सुरक्षित पर्याय सोडून चटकन रेल्वे स्थानक गाठवण्यासाठी रुळ ओलांडण्याचा धोका पत्करतात त्यातून असे अपघात घडतात असे रेल्वेच्या एका अभ्यासकाने सांगितले. गुरुवारी झालेल्या विविध रेल्वे अपघातांमध्ये आठ जण जखमी झाले आहेत.