निकेत पावसकरतळेरे (सिंधुदुर्ग) : देवगड तालुक्यातील गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री याने आषाढी एकादशी निमित्ताने आपल्या कलेतून विठ्ठलाची अनेक रुपे साकारली आहेत. मोक्षदा एकादशी पासुन आषाढी एकादशी पर्यंत एकूण १६ विविध रुपे त्याने विठेवर साकारली आहेत.
सध्या कोरोनामुळे पंढरपुर येथील विठ्ठल दर्शन होणार नाही. मात्र, विठ्ठल भक्तांचा हिरमोड होऊ नये म्हणुन वेगवेगळ्या १६ रुपातील विठ्ठल विटेवर पाहता येणार आहेत. आपली कला त्याने विठूरायाच्या चरणी अर्पण केली आहे.विठ्ठल म्हणजे असंख्य वारकर्यांचा सखा, सोबती. विठ्ठलाच्या दर्शनासाठी मैलोनमैल पायी वारी करुन विठ्ठल दर्शन घेणारेही असंख्य विठ्ठल भक्त आहेत. गतवर्षी आणि याहिवर्षी कोरोनामुळे पंढरपुर येथे विठ्ठल दर्शन बंद करण्यात आले आहे. विठ्ठल भक्तांच्या मनातील ती इच्छा अचुक ओळखून त्याने यावर्षी आपल्या कलेच्या माध्यमातून वारकऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे.याबाबत माहिती देताना अक्षय मेस्त्री म्हणाला की, ५ जुलैला मोक्षदा एकादशी पासुन दररोज एक विठ्ठलाचे रुप विटेवर साकारले. आषाढी एकादशी पर्यंत एकुण विठ्ठलाची विविध १६ रुपे तयार झाली आहेत. वारकऱ्यांना दररोज वेगळ्या रुपातील हा विठ्ठल पहायला मिळणार आहे.यापूर्वी अक्षयने तुळशीच्या पानावर विठ्ठलाचे सर्वात छोटे चित्र काढले होते. तसेच, दिड एकर शेतात विठू रायाचे भव्य दर्शन घडवले होते. यावर्षी काढलेल्या चित्राबद्दल माहिती देताना अक्षय म्हणाला की, विटेवर एक चित्र काढायला साधारण अर्धा तास लागतो. या विटेवरील विठ्ठल भक्तांना पहायला मिळणार आहे.या विटा भविष्यात प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. त्यातून विठ्ठलाचे सोजरे रुप रसिकांना पहायला मिळेल आणि आनंदही मिळू शकेल.चित्रकलेमधून वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या या अवलियाच्या प्रयोगाला नेहमीच सामाजिक किनार असते. कोकणातील रात्र प्रतिबिंबित होणारी "कोकण रात्र" आणि गड किल्ले संवर्धनासाठी प्रत्येकाला साद देणारी "हाक अस्मितेची" हे दोन महत्वपूर्ण उपक्रम सुरु असल्याचे अक्षय याने सांगितले.