लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात १० जानेवारी रोजी दक्षता मात्रा मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेला दोन महिने पूर्ण झाले असतानाही दक्षता मात्रासाठी लोक पुढाकार घेत नसल्याची स्थिती आहे. राज्यासह देशभरात कोविडचा संसर्ग कमी झाला असून, सद्य:स्थितीत सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. परिणामी, कोरोनाची भीती गेल्याने या दक्षता मात्रा मोहिमेसाठी लोक सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात दोन महिन्यात केवळ १५ लाख ९७ हजार ४०५ जणांनी दक्षता मात्रेचा डोस घेतला आहे.
राज्यात आतापर्यंत तीन लाख सात हजार ६९६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दक्षता मात्रा घेतली आहे तर तीन लाख २४ हजार २१ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी दक्षता मात्रेचा डोस घेतला आहे. साठहून अधिक वय असणाऱ्या नऊ लाख ६५ हजार ६८८ जणांनी दक्षता मात्रा घेतल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोनाची तिसरी लाट मुंबईत ओसरली आहे.
दैनंदिन रुग्णसंख्येचे प्रमाणही सुमारे दीडशेच्याही खाली गेले आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शहरात लसीकरणाचा जोरही कमी झाला आहे. परिणामी, दक्षता मात्रेवरही याचा परिणाम झाला आहे. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असल्याच्या भीतीने वर्धक मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर रांगा लागत होत्या. यात ६० वर्षांवरील नागरिकांचीच संख्या अधिक होती. परंतु फेब्रुवारीपासून लाट वेगाने ओसरत आल्यामुळे दक्षता मात्रा घेणाऱ्यांच्या संख्येतही घट झाल्याचे आढळले आहे.
१५ ते १८ वयोगटातही लसीकरणाबाबत उदासीनताराज्यात १५ ते १८ वयोगटातील केवळ ५७ लाख ७५ हजार ७११ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला आहे. त्यात ३६ लाख ५१ हजार ६४३ जणांनी पहिला डोस, तर २१ लाख २४ हजार ६८ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.