अमरावती : पश्चिम विदर्भातील २३ मध्यम प्रकल्पांपैकी १६ मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा सद्यस्थितीत असल्याने पुढील वर्षाची सिंचनासह पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. मात्र, उर्वरित सात मध्यम प्रकल्पांमध्ये ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा नाही. बुलडाणा जिल्ह्यात हे प्रकल्प आहेत. यामुळे येथे उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.पश्चिम विदर्भातील एकूण २४ प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ६७६.७४ दलघमी एवढा आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाढा हा ४५६.०९ दलघमी आहे. २४ प्रकल्पांमध्ये सरासरी ६७.४० टक्के पाणीसाठा असला तरी यवतमाळ, अकोला व वाशिम जिल्ह्यांची स्थिती खूपच चांगली आहे. त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क््यांंपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्याला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आॅक्टोबरमध्ये या जिल्ह्यातील सिंचनाला पाणी किती द्यायचे किंवा नाही तसेच पिण्यासाठी किती साठा राखीव ठेवायचा, यासंदर्भाचे धोरण ठरणार असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
अशी आहे, प्रकल्पनिहाय पाणीसाठ्याची स्थिती...अमरावती जिल्ह्यातील शहानूर प्रकल्पात ६४.०५ टक्के, चंद्रभागा ७१.१८ टक्के, पूर्णा ५०.१० टक्के, सपन ८७.२३ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस ९०.०२ टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ८८.०८ टक्के, वाघाडी ८२.०४ टक्के, बोरगाव १०० टक्के, नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा १०० टक्के, मोर्णा ४९.७१ टक्के, उमा १०० टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण ९१.६९ टक्के, सोनल १००टक्के, एकबर्जी १०० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा १९.९८ टक्के, पलढग २५.५७ टक्के, मस ४.१२ टक्के, कोराडी ६.२८ टक्के, मन २४.६८टक्के, तोरणा १४.३२ टक्के आणि उतावळी प्रकल्पात ३५.८३ टक्के पाणीसाठा आहे.