मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. त्यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. दरम्यान राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या १६ आमदारांनी द्रौपदी मुर्मूच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रातच नव्हती तर देशभरातून क्रॉस व्होटिंग झाल्याचे समोर आले आहे.
देशभरात १०४ आमदारांची क्रॉस व्होटिंग केले असून त्यातील १६ राज्यातील असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते. भाजपने द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी मोठी तयारी केली होती. त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, या निवडणूकीत मोठ्य प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तब्बल १७ खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूच्या बाजूने क्रॉस व्होट केले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मते तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मते मिळाली आहेत. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच द्रौपदी मुर्मू यांनी आघाडी घेतली होती ती अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यापर्यंत कायम राखली. पहिल्या टप्प्यात द्रौपदी मुर्मू यांना ५४० मते मिळाली होती. या मताचे मूल्य ३,७८,००० इतके होते. तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ मते मिळाली होती. त्यांच्या मतांचे मूल्य १,४५,००० इतके होते. दुसऱ्या फेरीत मुर्मू यांना १३४९ मते मिळाली तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मते मिळाली.
एकनाथ शिंदे यांचा २०० मतांचा दावा ठरला योग्य या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी शिंदे गट आणि भाजपा आमदारांच्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये झालेल्या एकत्रित बैठकीत द्रौपदी मुर्मू यांना राज्यातून २०० मते मिळतील, असा अंदाज एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता. त्यात भाजपा १०६ , शिंदे गट ५० असे मिळून १७० जण होते. तसेच उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिल्याने शिवसेना आमदारांची १६ मतेही राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मूर्मुंना मिळाली होती. हा सगळा आकडा १८५ च्या आसपास जातो. २०० चा आकडा शिंदे यांनी सांगितला होता. त्यामुळे त्यांच्या अपक्षेप्रमाणे १६ मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते आशिष शेलार यांनीही हे संकेत आधी दिले होते, मात्र त्यांनी आकडा सांगितला नव्हता.