- सतीश डोंगरे, नाशिकधावत्या रेल्वेत कधी भुकेमुळे कासावीस होऊन रडणाऱ्या चिमुकल्याला दुधाची व्यवस्था, कधी छेडछाडीपासून तरुणीची सुटका, तर कधी पाण्याच्या बाटलीचे जास्त रुपये घेतले म्हणून रेल्वे कॅन्टीनला दंड ठोठावणाऱ्या ट्विटप्रेमी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रवाशांच्या मदतीसाठी देशातील रेल्वेच्या १६ विभागांत नवीन ट्विटर हॅण्डल सुरू केले आहे. या सर्व अकाउंट्सची यादी नुकतीच रेल्वे मंत्रालयाने ट्विटरवरच प्रसिद्ध केली आहे.प्रवाशाचे एक ट्विट अन् रेल्वेची संपूर्ण यंत्रणा मदतीसाठी सज्ज, अशाच काहीशा सकारात्मक घटना गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनत आहेत. ‘ट्विट करा अन् मदत मिळवा’ असे जणू काही घोषवाक्य बनलेल्या रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ट्विटर अकाउंट्सचा आवाका आणखी वाढविला आहे. रेल्वेच्या देशभरातील तब्बल सोळा विभागांमधील व्यवस्थापक आणि साहाय्यक क्षेत्रीय व्यवस्थापकांच्या देखरेखीअंतर्गत हे अकाउंट्स तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागात व्यवस्थापकांचे एक आणि सहायक क्षेत्रीय व्यवस्थापकांचे तीन ते पाच ट्विटर अकाउंट्स तयार करण्यात आले आहेत. रेल्वेच्या या नव्या ट्विटर अकाउंट्समुळे प्रवाशांना तातडीने मदत मिळविणे सोपे होणार आहे. पूर्वी प्रवाशांना रेल्वे मंत्रालय किंवा खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याच अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट टॅग करावे लागत असे. त्यामुळे प्रवाशांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी काही काळ का होईना विलंब लागत असे; मात्र या नव्या अकाउंट्समुळे यंत्रणेला प्रवाशांमुळे तातडीने मदत पोहोचविणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर या नव्या ट्विटर अकाउंट्समुळे रेल्वेतील गैरप्रकार उघड करणेही आता सोपे झाल्याने प्रशासनापुढे एक प्रकारचे आव्हानच असेल. दरम्यान, रेल्वेच्या या नव्या ट्विटर कारभाऱ्यांचे प्रवाशांनी स्वागत केले असून, रेल्वेमंत्री प्रभू यांच्या पोस्टला रीट्विट करून त्यांचे आभार मानले आहेत. रेल्वेमंत्र्यांचे प्रवाशांना टिष्ट्वट करण्याचे आवाहन रेल्वेच्या सोळा विभागांतील ट्विटर हॅण्डलची यादी प्रसिद्ध करताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रवाशांनी मदत तथा तक्रारी नव्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट कराव्यात, असे आवाहन केले आहे. व्यवस्थापक व सहायक क्षेत्रीय व्यवस्थापकांनी तातडीने प्रवाशांच्या ट्विटची दखल घ्यावी, असे एकप्रकारे आदेशच दिले आहेत.
या विभागात ट्विटर हॅण्डलर...मध्य रेल्वे (मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर, भुसावळ)उत्तर पूर्व रेल्वे (इज्जतनगर, लखनऊ, वाराणसी)दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (बिलासपूर, रायपूर, नागपूर)पूर्व रेल्वे (सीलदाह, हावडा, आसनसोल, मालदा)उत्तर पूर्व रेल्वे (कटीहार, अलीपूरद्वार, रंगीया, तीनसुकिया, लमदिंग)दक्षिण पश्चिम रेल्वे ( हुबळी, बेंगळुरू, म्हैसूर)पूर्व मध्य रेल्वे (दानापूर, धनबाद, मुगलसराय, समस्तीपूर, सोनपूर)उत्तर पश्चिम रेल्वे (जयपूर, जोधपूर, बिकानेर, अजमेर)पश्चिम रेल्वे (मुंबई, अहमदाबाद, रतलाम, राजकोट, भावनगर, वडोदरा)पूर्व तट रेल्वे (वाल्टर, खुर्दारोड, संबलपूर)दक्षिण रेल्वे (चेन्नई, त्रिवेंद्रम, सालेम, मदुराई, पालघाट, तिरूचिरापल्ली)पश्चिम मध्य रेल्वे (भोपाळ, जबलपूर, कोटा)उत्तर रेल्वे (मुरदाबाद, फिरोजपूर, लखनऊ, दिल्ली, अंबाला)दक्षिण मध्य रेल्वे (सिकंदराबाद, हैदराबाद, विजयवाडा, गुंतकल, नांदेड, गुंटूर)दक्षिण पूर्व रेल्वे (चक्रधरपूर, अद्रा, खरगपूर, रांची)उत्तर मध्य रेल्वे (अलाहाबाद, झाशी, आग्रा)