लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ज्या गृहनिर्माण प्रकल्पात ग्राहकांनी गुंतवणूक केली आहे, त्याची माहिती संबंधितांना सहज उपलब्ध व्हावी या हेतूने बिल्डरांनी त्यांच्या प्रकल्पांची माहिती महारेराच्या वेबसाइटवर अद्ययावत करणे बंधनकारक असतानाही तब्बल १६ हजार बिल्डरांनी महारेराच्या नोटिशीला भीक घातलेली नसल्याचे चित्र आहे. बिल्डरांनी प्रकल्पाची माहिती अपडेट करावी यासाठी महारेराने जानेवारी महिन्यात राज्यभरातील १९ हजार ५०० बिल्डरांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, त्यापैकी केवळ तीन हजार जणांनीच प्रतिसाद दिला आहे.
१६ हजार बिल्डरांनी नोटिशीला प्रतिसादच दिलेला नाही किंवा ज्यांनी प्रतिसाद दिला त्यांनी तो समधानकारकरित्या दिलेला नसल्याचे महारेराचे म्हणणे आहे. त्यामुळे आता या १६ हजार बिल्डरांना पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे. महारेराने ज्या विकासकांना नोटीस पाठविली आहे. त्यांनी त्यांचे स्पष्टीकरण आणि माहिती १५ दिवसांत द्यायची आहे. या नोटिशीला प्रतिसाद देणार नाहीत, अशा विकासकांना आता ही अखेरची संधी असेल. या उपरही प्रतिसाद देणार नाहीत, अशा विकासकांची गंभीर दखल घेतली जाणार असून, त्यांच्यावर रेरा कायद्यानुसार कारवाई केली जाईल. या कारवाईची जोखीम, खर्च आणि परिणामांची जबाबदारी संबंधित विकासकांची असणार आहे.
फसवणूक होऊ नये म्हणून...
महारेराने मे २०१७ ला स्थापना झाल्यापासून ते मार्च २०२२ पर्यंत नोंदविलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. महारेराच्या संकेतस्थळावर विकासकांनी माहिती अद्ययावत केल्यास प्रकल्पाचे काम कुठपर्यंत आले, खर्च किती झाला आणि तत्सम माहिती ग्राहकाला उपलब्ध होते. घर खरेदीदाराची फसवणूक होऊ नये म्हणून महारेराने ही कारवाई सुरू केली आहे.