मुंबई : औरंगाबादजवळील वाळुंज येथील आपल्या प्रकल्पात पुढील पाच वर्षांत १६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा मानस स्टरलाइट उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी लंडनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी अग्रवाल आणि वेदांत समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम अल्बानीज यांच्याशीही चर्चा केली. वाळुंजमधील प्रकल्पात पुढील पाच वर्षांत एलसीडी पॅनेल फॅब प्रोजेक्टमध्ये १६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे सूतोवाच अग्रवाल यांनी यावेळी केले. राज्यात त्याची उभारणी झाल्यास तो देशातील पहिला सेमीकंडक्टर फॅब निर्मिती प्रकल्प असेल.स्मार्ट रोजगाराचे उद्दिष्टकेवळ वाढते नागरीकरण व त्याचे प्रभावी नियोजन हे स्मार्ट शहरांच्या निर्मितीमागचे उद्दिष्ट नसून, सामान्यांना अधिकाधिक कार्यक्षम सेवा मिळाव्यात तसेच पायाभूत सुविधांच्या विकासातून रोजगारनिर्मिती व्हावी, हे या अभियानामागचे प्रमुख ध्येय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लंडन येथे आयोजित एका परिषदेत सांगितले. प्रबोधन लीडर्स कॉन्क्लेव्ह २०१५ या परिषदेत मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती होती. भारत आणि ब्रिटनमधील अनेक प्रमुख उद्योगांचे मुख्य कार्यकारी अधिकारी या परिषदेस उपस्थित होते. स्मार्ट सिटी, शहरी विकास, खासगी भागीदारी, नवीन तंत्रज्ञान आणि महापौरांचे अधिकार यावर व्यापक प्रकाश टाकून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सेवांच्या अंमलबजावणीतील त्रुटी रोखण्यासाठी आपल्याला अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. वीज आणि पाणी यासारख्या सुविधा देताना त्याचा महत्तम उपयोग कसा होईल, याचीही काळजी घ्यावी लागेल. पाण्याचा प्रत्येक थेंब आणि प्रत्येक युनिट वीज वाचिवण्यासाठी किंवा त्याची नोंद होण्यासाठी त्या सेवांना स्मार्ट ग्रीडमध्ये टाकावे लागेल. यामुळे आपोआपच त्याच्या किमती कमी होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.स्मार्ट सिटीजच्या प्रकल्पात केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करीत आहे. पण खासगी गुंतवणुकीलाही पुरेसा वाव आहे. जनतेसाठीच्या अनेक सोयी खाजगी गुंतवणुकीतून पूर्ण करता येऊ शकतील. महापौरांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करताना त्यांना व्यापक अधिकार प्रदान करणे आवश्यक असून, आपले सरकार त्याही दृष्टीने पावले टाकत असल्याचीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. (विशेष प्रतिनिधी)
स्टरलाइट गुंतवणार १६ हजार कोटी
By admin | Published: November 14, 2015 3:34 AM