ऑनलाइन लोकमतलातूर, दि. १४ - शहरातील श्री सत्संग प्रतिष्ठानद्वारा पंढरपूर जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत दर्शनाची सोय करण्यात आली आहे़ गेल्या पंधरा वर्षापासून भाविकांना भावलेली मोफत दर्शनाची परंपरा आजही कायम ठेवण्यात आली असून, गुरूवारी सकाळी ११ वाजता लातूर मध्यवर्ती बसस्थानकातून विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना महापौर दीपक सूळ यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. गेल्या पंधरा वर्षापासून श्री सात्संग प्रतिष्ठान लातूरच्या वतीने अध्यक्ष गोविंदलाल पारीख, सचिव चंदू लड्डा, कार्याध्यक्ष रमेशचंद्र भुतडा, उपाध्यक्ष दत्ता लोखंडे, कोषाध्यक्ष रामेश्वर भराडीया यांनी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे़ या प्रतिष्ठानच्या वतीने पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी ११ बसेसचे नियोजन मोफत करण्यात आले आहे़. तसेच भाविकांच्या फराळाची सोय व्हावी यासाठी सोबत भोजनाचे पॉकेट व केळींची सोय करण्यात आली आहे़ या प्रतिष्ठानच्या वतीने निस्वार्थ भावानेने भाविकांसाठी सुरू केलेल्या मोफत विठ्ठल दर्शनाचा वसा आजपर्यंत कायम जोपासला असल्याने शेकडो भाविकांनी गुरूवारी मध्यवर्ती बसस्थानकातील पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनसाठी मध्यवर्ती बसस्थानकातून रवाना झाले आहेत़ या भाविकांना निरोप देण्यासाठी महापौर दीपक सूळ, उपमहापौर चाँदपाशा घावटी, मनपा विरोधी पक्षनेते मकरंद सावे, विक्रम गोजमगुंडे, रेणुकाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवराज मोटेगावकर, उद्योगपती बालकिशन मुंदडा, द्वारकादास शामकुमारचे तुकाराम पाटील, दिलीप माने, स्थानक प्रमुख बलभीम पाटील, व्यंकट बिराजदार,नवलकिशोर सारडा, बालाजी बारबोले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती़.
अखंडपणे सेवेची परंपरा...श्री सत्संग प्रतिष्ठान लातूरच्या वतीने दरवर्षीपणे याहीवर्षी पंढरपूरला विठ्ठल-रूक्मिणी दर्शनासाठी मोफत बसची सेवा सुरू करण्यात आली़ ही सेवा गेल्या पंधरा वर्षापासून सुरू असून, हे १६ वे वर्ष आहे़ दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्यामुळे या वर्षी ११ बसेसची सोय करण्यात आली आहे़ ही सेवा अखंडपणे चालू ठेवणार असल्याचा विश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पारीख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.