सितम सोनवणे,
लातूर, दि. २२ : लातूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांत डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे १६५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे रक्त नमुन्यांच्या तपासणीअंती अहवाल आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. या डेंग्यूमुळे बीड जिल्ह्यात दोघांचा तर नांदेड जिल्ह्यात एकाचा अशा एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. अन्य रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लातूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड आणि नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे डासोत्पत्तीचे प्रमाण वाढले असून, परिणामी, ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण वाढले असून, रुग्णांना थंडी वाजून ताप येणे, ताप सतत एक दिवसाआड येणे, नंतर घाम येऊन अंग थंड पडणे, डोके खूप दुखणे, उलट्या होणे आदी प्रकार घडत आहेत. तर काही रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाचा ताप असून, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, उलट्या होणे आदी बाबी होत असल्याने रुग्णांवर शहरातील सर्वोपचार रुग्णालयासह प्राथमिक व जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
आरोग्य विभागाने १ जानेवारीपासून अशा रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेतले असून, मागील दोन महिन्यांत या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या रुग्णसंख्येत लातूर जिल्ह्यातील ६४ रुग्णांचे रक्तनमुने तपासले असता त्यातील २३ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर लातूर महापालिका कार्यक्षेत्रातील ३७ जणांचे असे एकूण रक्तनमुने तपासले असता त्यातील दहा जणांना डेंग्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा एकूण १०७ जणांचे रक्तनमुने तपासले असता यातील ३३ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील २१० जणांचे रक्तनमुने तपासले असता त्यातील दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले. तर बीड जिल्ह्यातील ४५५ जणांचे रक्तनमुने तपासले असता त्यातील २८ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तर नांदेड जिल्ह्यातील २९३ जणांचे रक्तनमुने तपासले असता त्यातील ५५ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर नांदेड महापालिका कार्यक्षेत्राअंतर्गत १५६ रुग्णांची तपासणी केली असता यातील ४७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे.
चार जिल्ह्यांतील रुग्णांची तपासणी...डेंग्यूच्या तपासण्या बीड जिल्हा रुग्णालय तसेच नांदेड जिल्हा रुग्णालयात होत असून, चारही जिल्ह्यांतील एकूण १२१५ रक्त नमुन्यांची तपासणी केली असता त्यातील १६५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला असल्याचे आरोग्य उपसंचालक व्ही.एम. कुलकर्णी यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले