पालघर : ओखा, पोरबंदर येथील बंदरातून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी मच्छीमारांना पाकिस्तानी सैन्याने तुरुंगात डांबले आहे. अनेक मच्छीमारांनी तुरुंगातील शिक्षा भोगूनही त्यांची सुटका केली जात नाही. पाकिस्तानी कारागृहात मागील चार वर्षांपासून शिक्षा पूर्ण झालेले १४ भारतीय खलाशी, तर तीन वर्षांपासून १५१ खलाशी असे एकूण १६५ खलाशी आजही नरकयातना भोगत आहेत. मायभूमीत परतण्यासाठी ते व्याकूळ झाले आहेत.
मच्छीमारांनी तुरुंगातील शिक्षा भोगूनही त्यांची सुटका केली जात नसल्याने त्यांच्या सुटकेचे प्रयत्न करावेत, यासाठी आमदार सुनील भुसारा यांनी पालघरमध्ये आलेल्या केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक आणि कपिल पाटील यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. पाकिस्तानी कारागृहात मागील पाच वर्षांपासून शिक्षा पूर्ण झालेले ६५४ भारतीय मच्छीमार असून, त्यातील ६३१ मच्छीमारांची शिक्षा पूर्ण झाली आहे. दरम्यान, भारताच्या तुरुंगात असलेल्या एकूण ९५ पाकिस्तानी कैद्यांपैकी १२ कैद्यांची सुटका केल्याची माहिती इंडिया पाकिस्तान पीपल्स फोरम फोर पीस अँड डेमॉक्रॅसी या संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई यांनी ‘लोकमत’ला दिली.
जिल्ह्यातील मच्छीमारांच्या सुटकेसाठी विक्रमगडचे आमदार भुसारा यांनी अलीकडेच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवरून प्रयत्न करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. शनिवारी पालघर येथे एका कार्यक्रमात आलेल्या केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक आणि पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली.
जास्त पगारामुळे जातात गुजरातमध्येn पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी या तालुक्यांतील शेकडो मच्छीमार व आदिवासी खलाशी कामगार पालघरच्या किनारपट्टीवरील बोट मालकाकडून मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त पगार मिळत असल्याने गुजरात राज्यातील पोरबंदर, ओखा येथील बोटमालकांकडे कामासाठी जातात.n समुद्रात मासेमारीला जाताना प्रवाहाचा वेग आणि माशांच्या कळपाचा मागोवा घेत अनेक मच्छीमारांवर पाकिस्तानी क्षेत्रात प्रवेश केल्याचा ठपका ठेवला जातो. पाकिस्तानी सैनिकांकडून अटक केली जाते. त्यांना अटक केल्यानंतर त्यांची तुरुंगातील शिक्षा पूर्ण केल्यानंतरही त्यांची सुटका करण्यात केंद्रातील सरकारला अपयश येते. n आज शेकडो मच्छीमार पाकिस्तानी कैदेत खितपत पडून असल्याने त्यांचे कुटुंबीय संकटात सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबाची होणारी दैनावस्था आमदार भुसारा यांच्यासमोर त्या कुटुंबातील सदस्यांनी मांडल्यानंतर त्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष देऊन हा मुद्दा उचलून धरला आहे.