ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. २८ : 2010 चा शासन आदेश रद्द करण्यासह विविध मागण्यांकरिता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गृहरक्षकांनी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. त्या आंदोलनाकरिता घेतलेली परवानगी संपली असल्याचे म्हणत पोलिसांनी गुरुवारी 167 आंदोलकांना ताब्यात घेतले. राज्यकर्त्यांच्या हस्तक्षेपामुळे सदर आंदोलन दडपल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
गत 15 दिवसांपासून गृहरक्षकांनी 12 वर्ष सेवा झालेल्यांना सेवेतून कमी करणे व पुनर्नियुक्तीकरिता लादलेल्या जाचक अटी रद्द करण्याकरिता आंदोलन पुकारले होते. यात शासनाने 2016 च्या आदेशाला स्थगिती दिली होती. मात्र 2010 शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम होते. अशातच 25 जुलै रोजी आंदोलनाकरिता घेतलेली परवानगी संपली. आंदोलकांनी पुन्हा परवानगी अर्ज सादर केला. मात्र पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत परवानगी नाकारली. यामुळे आंदोलकांना पोलिसांनी आंदोलन स्थगित करण्याच्या सूचना बुधवारी देत 10 मिनिटाची वेळ दिली होती.
आंदोलकांनी आपली भूमिका कायम ठेवल्याने पोलिसांनी 522 जणांविरुद्ध 135 कलमानुसार गुन्हे दाखल केले होते. आज पोलिसांनी 167 आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलन उधळून लावले. ताब्यात घेतलेल्या महिला आंदोलकांना सेवाग्राम येथील रुग्णालयात तर पुरुष आंदोलकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य तापासणीकरिता पाठविण्यात आले आहे.