मुंबई : कमाल आणि किमान तापमानात दिवसेंदिवस घट नोंदविण्यात येत असल्याने मुंबईतल्या थंडीचा जोर वाढू लागला आहे. शनिवारी शहराचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०.५, १६.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, घटत्या तापमानामुळे हवेत गारवा आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. पुढील ४८ तासांसाठीही शहराचे किमान तापमान १७ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी, शहरात पडलेल्या थंडीचा कडाका आता कायम राहणार आहे.शनिवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे, तर दुसरीकडे नैर्ऋत्य अरबी समुद्र आणि लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. याचा परिणाम म्हणून, १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १६ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)