ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 10 - भिवंडीतील कोटरगेट भागात पोलीस ठाणे उभारण्याच्या वादातून १० वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीशी संबंधित खटल्यातून जिल्हा सत्र न्यायालयाने १७ आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.
या आरोपींविरुद्ध १४ विविध गुन्ह्यांचे आरोप ठेवून खटला चालला होता. मात्र सरकारी पक्ष आरोप सिद्ध न करू शकल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश ए.एस. भैसारे यांनी जाहीर केले. याच दंगलीच्या दरम्यान,रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या रमेश जगताप आणि बी. एस. गांगुर्डे या दोन पोलिसांवर सशस्त्र जमावाने हल्ला करून त्यांची भर रस्त्यात हत्या केली. त्यानंतर या दोघांचे मृतदेह जाळून टाकण्यात आले होते. या घटनेने त्यावेळी संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या दोघांच्या निर्घृण हत्येसंदर्भात स्वतंत्र खटला गुदरण्यात आला असून त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. आता लागलेला निकाल पोलीस ठाण्याच्या उभारणीला विरोध करताना झालेल्या दंगलीपुरताच आहे.
निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये अन्सारी अक्रम सोहेल, अन्सारी वसीम सोहेल, मोहमद रईस सल्लूउद्दीन अन्सारी, सुफीयान जमील कुरेशी, मोहमद आलम सौदागर अली अन्सारी, हसन अस्मान कुरेशी, जाफर इक्बाल अब्दुल जलील अन्सारी, सलीम शाह मोहमद मोमीन, अकील अब्दुल समद खान, नियाज अहमद रईस अहमद अन्सारी, मोहमद सलीम शफीक शेख, रिझवान अब्दुल सलीम उर्फ अलीम शेख, तौफीक अहमद समुद्दीन अन्सारी, आसीफ अब्दुल कलाम शेख, इक्बाल अहमद कुटूबूद्दीन अन्सारी, मोहमद अकील मोहमद शकील शेख, मोहमद शकील मोहमद शफीक शेख यांचा समावेश आहे.