जालना : विधानसभेतही युतीचेच वर्चस्व राहणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या पक्षांमधील जवळपास १७ आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छूक असून, त्यात उस्मानाबादचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांचाही समावेश असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.महाजनादेश यात्रा बुधवारी जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहे. भोकरदन, जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा हे प्रथमच महाराष्ट्राच्या दौºयावर येत असल्याचे त्यांनी सांगितले.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप- शिवसेना युतीच्या जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मात्र, सध्या आपण त्यावर भाष्य करणार नाही, असे दानवे यांनी सांगितले.
युतीची घोषणा केव्हाही होऊ शकते - मुख्यमंत्रीबीड : लोकसभा निवडणुकीपूर्वी युती होणार की नाही, अशी चर्चा होती. परंतु, अचानक युतीची घोषणा केली. यावेळीही तसेच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, लोकसभेला माध्यमांनी युतीसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा केल्या होत्या, परंतु आमची युती झाली. यावेळीही तसेच होईल. युतीसाठी वातावरण पोषक आहे. १५ वर्षे सत्तेत असताना जनतेशी संवाद न करता काँग्रेस-राष्टÑवादीची मंडळी स्वत:शीच संवाद करीत राहिली. त्यामुळे जनतेने निवडणुकीत त्यांचा पर्दाफाश केला. आमच्या या महाजनादेश यात्रेत जनता मागण्याही करते आणि आम्हास समर्थनही देते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. काँग्रेसची संवाद यात्रा तर मंगल कार्यालयातून सुरू झाली, अशी टिकाही मुख्यमंत्र्यांनी केली.विनायक मेटे यांचे बळ लोकसभेत दिसून आले, असा टोलाही त्यांनी लगावला.