पालघर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली. या वेळी संपूर्ण जिल्ह्यातून पाचवीचे १०,५६८ तर आठवीचे ७,३०१ परीक्षार्थी होते. दोन सत्रात तसेच बहुसंच पद्धतीचा अवलंब आणि चौथी एैवजी पाचवी आणि सातवी एैवजी आठवी इयत्तेसाठी प्रथमच परीक्षा हे यंदाच्या परीक्षेचे वैशिष्ट्य ठरले. पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांमध्ये १४८ केंद्रे होती. त्या पैकी इयत्ता पाचवीसाठी ८६ तर आठवीकरीता ६२ केंद्रे होती. तेवढ्याच केंद्र संचालकांची नियुक्ती केली होती. परीक्षेसाठी पाचवीच्या १०,५६८ तर आठवीच्या ७, ३०१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी अनुक्र मे १०,११६ आणि ७,००३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. माध्यमनिहाय एका वर्गात २४ विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी एकूण ७२५ पर्यवेक्षकांनी काम पाहिले. या परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या परिक्षार्थ्यांना ए, बी, सी, डी या पद्धतीने प्रश्नपत्रिका संच देण्यात आले होते. पाचवी करिता उत्तराच्या चार पैकी एक पर्याय योग्य होता, तर आठवीला प्रत्येक पेपरात कमाल वीस टक्के प्रश्नांच्या बाबतीत चारपैकी दोन उत्तरांचे पर्याय योग्य असून दोन्हीही नोंदवणे बंधनकारक होते. विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या व न सोडविलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेवर परीक्षेचा वेळ संपल्यावर तत्काळ नोंदविण्यात आली. या पूर्वी तीन सत्रात होणारी परीक्षा या वेळी ११ ते १२:३० आणि १:३० ते ३ या दोन सत्रात घेतली गेली. जिल्हास्तरावर स्कॉलरशिप संबंधी माहिती दिल्यानंतर त्याचे तालुकास्तरावर ट्रेनिग देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून रंगीततालीम करून घेतली होती. जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा पार पाडण्यात यश आले.प्रवेशपत्र आॅनलाइनपरीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून त्याची प्रिंट काढण्याची सुविधा असल्याने गहाळ किंवा विसरले गेल्यास संबंधित शाळेशी संपर्क साधण्यात विद्यार्थी व पालकांची होणारी तारांबळ आदि प्रकारांना आळा घालता आला.
पालघर जिल्ह्यात शिष्यवृती परीक्षेला १७ हजार विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2017 3:21 AM