ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 27 : आयुष्यातील पोलीस सेवेची २० ते २५ वर्षे मुंबई शहरात गेली असताना आणि आता ऐन निवृत्तीच्या वाटेवर असताना मुंबईतील डझनावर महिला पोलीस अधिकाऱ्यांना थेट घरापासून कोसोदूर ग्रामीण भागात पाठविण्यात आले आहे. पदोन्नतीच्या आडोश्याने दूरवर झालेल्या या बदल्यांविरोधात महिला अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळत आहे. मुंबई महानगररातील पोलीस अधिकारी ग्रामीण महाराष्ट्रात काम करताना चाचपडतो. कारण या दोनही भागातील समस्या वेगवेगळ्या आहेत.
अशीच अडचण ग्रामीण महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई शहरात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील अधिकाऱ्यांना बाहेर अर्थात ग्रामीण महाराष्ट्रात सक्तीने पाठविले जाते. तारुण्यात असलेले पोलीस अधिकारी अनेकदा आनंदाने ग्रामीण भागात जातात. परंतु शासनाने आता चक्क सेवानिवृत्तीवर आलेल्या आणि त्यातही महिला अधिकाऱ्यांना मुंबईपासून ८०० ते हजार किलोमीटरवर नियुक्त्या दिल्या आहेत.
शासनाने १ आॅक्टोबर रोजी ११० पोलीस निरीक्षकांना बढती देऊन उपअधीक्षक बनविले. या यादीतील १६ ते १७ महिला अधिकाऱ्यांना नागपूर, अकोला, हिंगोली, औरंगाबाद, पुणे, नाशिक, जालना, बीड, अमरावती, उस्मानाबाद, ठाणे या भागात नेमण्यात आले आहे. यातील बहुतांश महिलांच्या सेवानिवृत्तीसाठी अवघी दोन ते तीन वर्ष शिल्लक आहेत. कुणाला आजार आहेत तर कुणाला कौटुंबिक जबाबदारी. निवृत्तीच्या वाटेवर असताना घरापासून दूर नियुक्ती झाल्याने या महिलांमध्ये महासंचालक कार्यालयाच्या कारभाराबाबत रोष पहायला मिळतो आहे. यातील बहुतांश महिलांची नियुक्ती ही गृह पोलीस उपअधीक्षक पदावर झाली आहे.
मुंबईत जातीय दंगली घडत असताना आणि गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सर्रास खुलेआम चकमक होत असताना आम्ही जीव धोक्यात घालून मुंबईत नोकरी केली आणि आता कौटुंबिक जबाबदाऱ्या असताना महासंचालक कार्यालयाने आम्हाला घरापासून कोसोदूर नियुक्त्या दिल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्याची भावना महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तुळातून ऐकायला मिळत आहे. फौजदार, सहायक निरीक्षक असताना या नियुक्त्या झाल्या असत्या तर आम्ही आनंदाने कितीही दूरवर रुजू झालो असतो. परंतु सेवाकाळ संपण्याच्या स्थितीत या नियुक्त्या झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले