नाशिक : प्रधानमंत्री कृषी योजनेंतर्गत या वर्षभरात १७ हजार ५६५ शेतकऱ्यांना लाभ देण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून, त्या माध्यमातून १३,५२४ हेक्टर इतके क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली येणार असल्याचा दावा करण्यात येणार आहे. गतवर्षात कृषी विभागाच्या वतीने अनुदानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८ हजार ५३९ शेतकऱ्यांच्या ५१२३.४० हेक्टर क्षेत्रावर ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यात आले आहेत. हे मागील वर्षीच्या खरीप हंगामाचे वैशिष्ट्य ठरल्याचा दावा केला जात आहे.
पिकांसाठी पाण्याचा कार्यक्षमपद्धतीने वापर व्हावा कमी पाण्यात अधिकाधिक उत्पादन घेता यावे यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुषार आणि ठिबक सिंचन संच घेण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा जिल्ह्यातील अनेक शेतकरी लाभ घेऊ इच्छित असले तरी यासाठी उपलब्ध होणाऱ्या अनुदानाप्रमाणे लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जात असते. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. गतवर्षात साडेआठ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातही अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.