पुणे : बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि राज्यात कोरोना महामारीचा झालेला उद्रेक या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले रेडी रेकनरचे दर अखेर निश्चित झाले असून, राज्यात शनिवार (दि.१२) पासून नवीन दर सुची लागू करण्यात आली आहे. राज्यात गेल्या अडीच वर्षांनंतर प्रथमच सरासरी १.७४ टक्के दरवाढ करण्यात आली असून, ही दर वाढ नैसर्गिक असल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.राज्यात गेल्या दोन वर्षांपासून १ एप्रिलपासून रेडी रेकनरचे नवीन दर लागू होतात. त्यासाठी रेडी रेकनर दर निश्चितीचे प्रारूप नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून तयार केले आहेत. यात राज्यात सर्वत्र रेडी रेकनरच्या दरात वाढ प्रस्तावित केले जातात. परंतु यंदा मार्च महिन्यांत राज्यात कोरोना महामारीचे संकट आणि त्यानंतर लाॅकडाऊन जाहिर झाल्याने एप्रिल महिन्यात नवीर दर सुची लागू करणे शक्य नसल्याने यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने मुदत वाढ दिली. अखेर आता शनिवार (दि.१२) पासून राज्यात रेडी रेकनरचे नवीन दर लागू होणार आहेत.यामध्ये राज्यात सरासरी १.७४टक्के वाढ झाली असून, ग्रामीण भागात सरासरी २.८१ टक्के वाढ करण्यात आली आहे. ----- राज्यातील रेडी रेकनर दरातील सरासरी वाढ : १. ७४टक्के- ग्रामीण क्षेत्रातील वाढ : २. ८१ टक्के - प्रभाव क्षेत्रातील वाढ : १.८९ टक्के - नगरपरिषदा व नगर पंचायत क्षेत्रात वाढ : १.२९ टक्के - महानगरपालिका क्षेत्रातील दर वाढ : १.०२ टक्के ------राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील दर वाढ- मुंबई : - ०.६ (घट) - ठाणे : ०.४४ टक्के- नवी मुंबई : ०.९९ टक्के- पुणे : ३. ९९टक्के- नाशिक : ०.७४ टक्के - नागपूर : ०.१ टक्के -----
बांधकाम क्षेत्रातील मंदी व कोरोनामुळे रखडलेले 'रेडी रेकनर'चे दर अखेर निश्चित; १.७४ टक्के नगण्य दरवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 7:25 PM
राज्याचे नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांची माहिती
ठळक मुद्देराज्यातील रेडी रेकनर दरातील नैसर्गिक वाढ