जमीर काझी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य परिवहन विभागातील (आरटीओ) अधिकाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कार्यालयीन कामासाठी वापरण्यात येणारी वाहने बदलण्यात येणार असून, त्याऐवजी अद्ययावत १७४ नव्या वाहनांचा ताफा त्यांच्या दिमतीला येणार आहे. आरटीओच्या विविध दर्जाच्या अधिकारी आणि वायुवेग, भरारी व सीमा तपासणी नाक्यावर, सध्या उपलब्ध असलेल्या वाहनांचा आढावा घेण्यासाठी, राज्यस्तरीय समिती बनविण्यात आलेली होती. त्यामध्ये सध्याची अनेक वाहने जुनी झाल्याने ती बदलण्याची आवश्यकता नमूद करण्यात आली. विभागात एकूण विविध दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी ७३ कार व भरारी पथकासाठी १०१ अशी एकूण १७४ वाहनांची खरेदी करणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. गृहविभागाने या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिल्याने आता ‘आरटीओ’ नवीन वाहने खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी येणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च विभागासाठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून वापरावयाचा आहे. यासाठी असलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून ही खरेदी करावयाची आहे. त्याचप्रमाणे, जुन्या वाहनांसाठी शासनाने नमूद केलेल्या प्रणालीचा वापर करावयाचा आहे..
परिवहन विभागाला मिळणार १७४ गाड्या
By admin | Published: May 15, 2017 6:33 AM