नारायण जाधव, ठाणेराज्यातील पोलीस वसाहतींच्या दुर्दशेबाबत सर्वत्र टीकेची झोड उठविली जात आहे. गृह खात्याविषयी पोलीस कर्मचाऱ्यांत संताप आहे़ त्यामुळे आपल्याच कर्मचाऱ्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी आता राज्यात नव्याने १ हजार ७४७ नवीन घरे बांधण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे़ यानुसार, अर्थसंकल्पात पोलिसांच्या घरांसाठी ७०़२३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात गृह खात्याने ४२ कोटी १३ लाख ८० हजार रुपयांचा निधी पोलीस गृहनिर्माण महामंडळास वितरित केला आहे़ राज्यातील अनेक पोलीस वसाहतींना देखभाली अभावी घरघर लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागांनी, निधीचे कारण पुढे करून त्याकडे दुर्लक्ष केले आहे़ यामुळे या वसाहतींच्या डागडुजीसाठीही निधी देण्याची मागणी होत आहे़या निधीतून औरंगाबाद येथील राज्य राखीव दलाच्या पोलिसांसाठी तेथील सातारा भागात ३०८ निवासस्थानांसाठी अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत़ औरंगाबाद पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ५६ निवासस्थाने बांधण्यासाठी १ कोटी १८ लाख ६ हजार रुपये दिले आहेत़ तुळजापूरच्या नवरात्रौत्सवात लागणारा वाढीव बंदोबस्त लक्षात घेता, त्यासाठी बाहेरगावांहून येणाऱ्या पोलिसांची गैरसोय दूर व्हावी, म्हणून तब्बल ४०० निवासस्थाने बांधण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. यावर ३ कोटी ४८ लाख ८७ हजार रुपये खर्च पहिल्या टप्प्यास मंजूर केला आहे़याशिवाय, रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे ३६ घरांसाठी ४० लाख १० हजार, सोलापूर येथील सोरेगाव येथे राखीव दलाच्या पोलिसांच्या १९७ घरांसाठी ४ कोटी ३५ लाख ८ हजार, विटा-सांगली येथे ५१ घरांसाठी ३ कोटी २ लाख १८ हजार, आटपाडी येथे ४७ घरांसाठी ८४ लाख ७५ हजार, नंदुरबार येथे १६८ घरांसाठी १ कोटी ७६ लाख २४ हजार आणि यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील ५२ घरांसाठी ५ कोटी ६६ लाख ८५ हजार असे एकूण ४२ कोटी १३ लाख ८० हजार रुपये गृह खात्याने नोव्हेंबरअखेरीस मंजूर केले आहेत़
पोलिसांसाठी १,७४७ घरे
By admin | Published: December 02, 2014 4:32 AM