१,७६७ कोटींचा भूखंड घोटाळा, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 06:10 AM2018-07-03T06:10:24+5:302018-07-03T06:12:25+5:30
बांधकाम व्यावसायिक मनिष भतीजा आणि संजय भालेराव यांना अवघ्या साडेतीन कोटी रुपयांत विकण्यात आली असून हा व्यवहार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास खाते, सिडको आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या संगनमताने झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
मुंबई : नवी मुंबईतील सिडकोच्या २४ एकर जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेली १७६७ कोटी रुपयांची जमीन बांधकाम व्यावसायिक मनिष भतीजा आणि संजय भालेराव यांना अवघ्या साडेतीन कोटी रुपयांत विकण्यात आली असून हा व्यवहार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास खाते, सिडको आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या संगनमताने झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश केला केला. नवी मुंबईतील सिडकोच्या मालकीची रांजणपाडा, खारघर या मोक्याच्या ठिकाणची २४ एकर जमीन (सध्याची किंमत: १७६७ कोटी) कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आली होती. मात्र या जमिनीचे संजय भालेराव यांच्या नावे मुख्त्यारपत्र तयार करून ती जमीन पॅरडाईज बिल्डरच्या मनीष भतीजा यांना अवघ्या ३ कोटी ६० लाख रुपयांना विकण्यात आली. हा सगळा व्यवहार १४ मे २०१८ या एकाच दिवशी पार पडला. हा भूखंड घोटाळा मुख्यमंत्र्यांकडील नगरविकास खात्याशी संबंधित असल्याने याची चौकशी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्र्तींमार्फत करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड आणि बांधकाम व्यावसायिक मनीष भतिजा यांचे व्यवहारिक संबंध असून त्यातूनच हा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले प्रश्न
सिडकोची सेंट्रल पार्कसाठी राखीव ठेवलेली जमीन रायगडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकारात कोयना प्रकल्पग्रस्तांना दिली?
कोयना प्रकल्पात हजारो शेतकरी विस्थापित झालेले असताना आठच शेतकरी कोणत्या निकषांवर निवडले गेले?
प्रकल्पग्रस्तांना शेतजमीन देण्याचा नियम असताना त्यांना शहरातील मोक्याची जमीन कशी देण्यात आली?
नियमाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना १० वर्षे जमीन विकता येत नसताना हा सगळा व्यवहार १४ मे २०१८ या एकाच दिवशी कसा झाला?
पॅरडाईज बिल्डरला सरकारचे हजारो कोटींचे नुकसान करून कवडीमोल भावाने जमीन का दिली?
या बिल्डरचे आणि सिडको व नागरी विकास मंत्रालय यांच्यामध्ये कोणते संबंध आहेत का?
काँग्रेसच्या मागण्या
२४ एकर जमिनीचे हस्तांतरण रद्द करा
बेकायदा जमीन हस्तांतरण करणा-यांवर कारवाई करा
न्यायालयीन चौकशी करा