आमदार अपात्रतेचा निकाल लावण्यासाठी १८ दिवस मॅरेथॉन सुनावणी; नार्वेकरांकडून तारखा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 04:39 PM2023-11-23T16:39:12+5:302023-11-23T16:42:22+5:30
डिसेंबर महिन्यात नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत असले तरी अधिवेशन काळातही वेळ मिळेल तसं या प्रकरणातील सुनावणी घेण्यात येणार आहे.
मुंबई : सुप्रीम कोर्टाने शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करत ३१ डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करून अंतिम निकाल देण्याचे आदेश दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणाच्या सुनावणीला वेग आला असून मागील तीन दिवसांपासून सलग सुनावणी होत आहे. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी अजून १८ दिवस सुनावणी होणार असल्याचं सांगत तारखाही जाहीर केल्या आहेत.
आमदार अपात्रता प्रकरणात २८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर आणि ११ डिसेंबर ते २२ डिसेंबर या काळात सार्वजनिक सुट्ट्या वगळता इतर दिवशी नियमित सुनावणी घेणार असल्याचं राहुल नार्वेकरांकडून घोषित करण्यात आलं आहे. पुढील महिन्यात नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन असले तरी अधिवेशन काळातही वेळ मिळेल तसं या प्रकरणातील सुनावणी घेण्यात येणार आहे.
सुनावणीसाठी १८ दिवस पुरेसे?
शिवसेनेतील फुटीनंतर विधानसभा अध्यक्षांकडे विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. हे सर्व प्रकरण कायदेशीरदृष्ट्या अत्यंत क्लिष्ट असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मागील तीन दिवसांत केवळ व्हिपच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीसाठी १८ दिवस पुरेसे आहेत का, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.
ठाकरे गटाची अध्यक्षांविरोधात नाराजी
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुनावणीदरम्यान पक्षपातीपणा करत असून शिंदे गटाला झुकते माप देत असल्याचा सुनील प्रभू यांनी आरोप केला आहे. याची रितसर तक्रार प्रभू यांनी विधानभवनाकडे केली आहे. साक्षी-पुरावे, प्रतिज्ञापत्रे सादर करण्यासाठी ठराविक वेळ दिलेली असताना राहुल नार्वेकर हे शिंदे गटाला वाढीव वेळ देत आहेत. यामुळे कारवाईस विलंब होत आहे, असं या तक्रारीत म्हटलं आहे.