मुंबई : लग्न करण्याचे वचन देऊन बलात्कार केल्याबद्दल औरंगाबाद येथील एका मुलीने दाखल केलेल्या फिर्यादीत पुण्याच्या भोसरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व तेथील न्याय दंडाधिकारी आणि सत्र न्यायाधीशांच्या हलगर्जीपणाने व चुकांमुळे आरोपीच्या विवाहित बहिणीस व मेव्हण्यास १८ दिवस नाहक कोठडीत राहावे लागल्याबद्दल राज्य सरकारने या बाधित दाम्पत्यास ५० हजार रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी कसूर करणाऱ्या भोसरी ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि भरपाईपोटी द्यावी लागलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, असाही आदेश न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने दिला.एवढेच नव्हे, तर ज्यांनी कायद्याची बूज न राखल्याने या दाम्पत्यास बेकायदेशीरपणे कोठडीत राहावे लागले त्या दंडाधिकारी व सत्र न्यायाधीशांविरुद्ध चौकशी करण्याचाही आदेशही दिला गेला. पोलीस आयुक्तांनी केलेल्या चौकशी व कारवाईचा अहवाल चार महिन्यांत उच्च न्यायालयास सादर करायचा आहे.पुण्यात हिंजेवाडी येथे राहणारा भारत साळवी, त्याची आई आणि इतर नातेवाइकांनी त्यांच्याविरुद्ध भोसरी पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली होती. ती अंशत: मंजूर करताना खंडपीठाने हा निकाल दिला. त्यानुसार व्यवसायाने डॉक्टर असलेली भारतची विवाहित बहीण मेरी व तिचे डॉक्टर पती अजय यांना सरकारने भरपाई द्यायची आहे. खंडपीठाने भारतविरुद्धचा बलात्काराचा गुन्हा कायम ठेवला. मात्र इतर नातेवाइकांवर नोंदलेले सर्व गुन्हे रद्द केले.या सुनावणीत अर्जदार साळवी व त्याच्या नातेवाइकांसाठी अॅड. क्षितिजा सारंगी, सरकारतर्फे प्रॉसिक्युटर संदीप शिंदे तर तक्रारदार महिलेसाठी अॅड. सत्यव्रत जोशी यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)न्यायनगर, गारखेडा, औरंगाबाद येथे राहणाऱ्या ल्युसिया पेतारस जाधव या तरुणीचा सरिता संगम अपार्टमेंट््स, कासारवाडी, पुणे येथील भारत वेवधन साळवी याच्याशी विवाह ठरला होता. दोन्हीकडच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत ल्युसिया व अजय यांचा १२ डिसेंबर २०१४ रोजी साखरपुडाही झाला होता. दोघेही परस्परांचे दूरचे नातेवाईकही आहेत. साखरपुड्याच्या आधी चार दिवस ९ डिसेंबर रोजी भावी सासरच्या घरी गेले असता उशीर झाल्याची सबब सांगून आपल्याला तेथेच राहायला सांगितले गेले.
पोलीस, न्यायाधीशांमुळे १८ दिवस कोठडी
By admin | Published: January 22, 2016 3:40 AM