मुंबई : या वर्षी पावसाळ्यातील १८ दिवस मुंबईकरांसाठी धोक्याचे ठरणार आहेत. महापालिकेच्या अनेक रखडलेल्या कामांमुळे पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याची भीती असतानाच १८ दिवस मोठ्या भरतीचे आहेत. त्यामुळे या काळात शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचणार नाही याची खबरदारी घेण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असणार आहे.ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे़ तसेच मुंबईत तयार झालेल्या पम्पिंग स्टेशननेही पुराच्या पाण्यापासून सुटका करण्याचा दावा केला आहे. मात्र कचरा व प्लॅस्टिकने तुंबणाऱ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासाठी बऱ्याच प्रयत्नांनंतर ठेकेदार मिळाले आहेत. त्यामुळे डेडलाइनपूर्वी कामे न झाल्यास पावसाळ्यात नाले भरून वाहण्याची भीती व्यक्त होत आहे. अशावेळी मोठ्या भरतीचे दिवस मुंबईची दैना उडवू शकतात. महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाने नुकतेच जाहीर केल्याप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात ४़ ५० मीटरहून अधिक उंच लाटा उसळणारे १८ दिवस आहेत़ तर या पावसाळ्यातील सर्वांत मोठी भरती २५ जून रोजी दुपारी असून, ४़९७ मीटर उंच लाटा या वेळी समुद्रात उसळणार आहेत. या काळात सखल भागांमध्ये पाणी तुंबण्याचा धोका आहे. (प्रतिनिधी)मोठ्या भरतीचा धोकामुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मिलीमीटर पावसाचे पाणी वाहून नेण्याची आहे़ मात्र मोठ्या भरतीच्या दिवशी समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटा पाणी बाहेर फेकत असतात़ अशावेळी पाऊस पडल्यास मुंबईत पाणी तुंबते़ २००९मध्ये शंभर वर्षांतील सर्वांत मोठी भरती मुंबईने अनुभवली़ त्या वेळेस २३ आणि २४ जुलै रोजी पाच मीटरहून मोठी भरती होती़२५ जून रोजी दुपारी समुद्रात सर्वांत मोठी भरती असणार आहे. या वेळेस समुद्रात ४.९७ मीटर उंच लाटा उसळणार आहेत. तसेच २३ ते २८ जून या सहा दिवसांमध्ये समुद्रात ४.५ मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत.जुलै महिन्यात २२ ते २७ या सहा दिवसांमध्ये समुद्रात मोठी भरती असणार आहे. यामध्ये २४ जुलै रोजी समुद्रात सर्वाधिक ४.८९ मीटर उंच लाटा उसळणार आहेत.आॅगस्ट महिन्यात २१ ते २४ या तीन दिवसांमध्ये समुद्रात मोठी भरती असणार आहे. त्यात २२ आॅगस्ट रोजी सुमद्रात सर्वांत उंच ४.७५ मीटर उंच लाटा उसळणार आहेत.सप्टेंबर महिन्यात १९ ते २२ या चार दिवसांमध्ये समुद्रात मोठी भरती असणार आहे. तर २२ सप्टेंबर रोजी सर्वाधिक ४.५४ मीटर उंच लाटा उसळणार आहेत.
पावसाळ्यातील १८ दिवस धोक्याचे
By admin | Published: May 02, 2017 5:37 AM