- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे गुरुवारी मात्र 18 प्रवाशांसाठी डेथलाईन ठरली. गुरुवारी एकाच दिवशी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 18 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 18 प्रवाशांना जीव गमावल्याचा हा उच्चांक आहे. 18 प्रवाशांनी प्राण गमावले असून 16 प्रवासी जखमी झाले आहेत. यावर्षी जानेवारीपासून ते ऑगस्टपर्यंत एकूण 2000 रेल्वे प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे. यामध्ये रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना अपघात होऊन मृत्यू झालेल्याचं प्रमाण जास्त आहे.
वसई जीआरपीच्या हद्दीत सर्वात जास्त प्रवाशांचा मृत्यू झाले आहेत. पाच प्रवाशांचा मिरा रोड ते वैतरणा दरम्यान मृत्यू झाला असून यामधील दोघांची ओळख पटलेली नाही. यामध्ये एका महिला प्रवाशाचा समावेश आहे. कल्याण स्थानक दुस-या क्रमांकावर असून तीन प्रवाशांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामधील एक महिला प्रवासी आहे. अज्ञात मृतदेहांची ओळख पटावी यासाठी रेल्वे पोलीस स्थानकांवर फोटो लावत आहेत.