हिवरी/जवळा (यवतमाळ) : पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवरील स्लॅब कोसळून १८ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आर्णी तालुक्यातील तरोडा येथे घडली़ जखमींना यवतमाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जवळा येथे जलस्वराज्य योजनेंतर्गत अडाण नदीच्या कवर विहीर खोदण्यात आली. या विहिरीवर स्लॅब टाकण्याचे काम सोमवारी सुरू होते. मात्र सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अचानक स्लॅब खाली कोसळल्याने कंत्राटदारासह १८ मजूरही विहिरीत कोसळले. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी मजुरांना बाहेर काढत उपचारासाठी यवतमाळला रवाना केले.या विहिरीचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. यावर स्लॅब टाकण्यासाठी चार महिन्यांपूर्वीच सेंट्रींग करण्यात आले होते. त्यानंतर दोनदा अडाण नदीला पूरही आला. सोमवारी स्लॅब टाकताना कोणतीही खातरजमा न करता शाखा अभियंता आणि कंत्राटदाराच्या उपस्थितीत कामाला सुरुवात केल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे़ विशेष म्हणजे सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान आजचे काम पूर्ण झाल्याचे सांगत मजुरांनी काम थांबविले होते. परंतु अभियंता व कंत्राटदाराने त्यांना पुन्हा काम करायला लावले. त्यामुळे स्लॅबचे वजन अधिक होऊन संपूर्ण स्लॅबच विहिरीत कोसळली. (वार्ताहर)
विहिरीवरील स्लॅब कोसळून १८ मजूर जखमी
By admin | Published: September 23, 2014 4:43 AM