मुंबई : एक वर्ष वयाच्या आतील मूल दत्तक घेणाऱ्या राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचारी महिलेस १८० दिवसांची विशेष रजा देण्याचा निर्णय वित्तविभागाने बुधवारी घेतला. यापूर्वी मूल दत्तक घेणाऱ्या कर्मचारी महिलेला ९० दिवसांची विशेष रजा दिली जात होती. केंद्र सरकारने प्रसूती रजेप्रमाणे १८० दिवसांची विशेष रजा मूल दत्तक घेणाऱ्या केंद्रीय कर्मचारी महिलेला देण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचारी महिलांबाबतही हाच निर्णय घेण्यात आला आहे. ही रजा मूल दत्तक घेतल्याच्या तारखेपासून लागू होईल. एक वर्षापर्यंतचे मूल दत्तक घेतलेल्या ज्या महिला कर्मचारी सध्या ९० दिवसांच्या विशेष रजेवर आहेत, त्यांना आता १८० दिवसांपर्यंत विशेष रजा लागू होईल. दोनपेक्षा कमी अपत्य असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना १९० दिवसांची विशेष रजा लागू राहील. एक अपत्य हयात असलेल्या कर्मचारी महिलेने सदर विशेष रजा घेतल्यानंतर प्रसूती रजा/दत्तक मुलासाठी, तसेच सरोगसीसाठी असलेली विशेष रजा लागू राहाणार नाही. विशेष रजेसाठी संबंधित महिलेच्या सेवा कालावधीची अट नाही. मात्र, ज्या महिला कर्मचाऱ्यांची सेवा दोन वर्षांपेक्षा कमी झालेली आहे, त्यांनी अर्ज करताना त्यांच्या कार्यालयास बाँड द्यावा लागेल. त्यात विशेष रजेवरून परतल्यानंतर दोन वर्षे सेवेत राहाणे अनिवार्य असेल. राजीनामा द्यायचा असेल, तर तिला विशेष रजा कालावधीतील वेतनाइतके वेतन राज्य शासनास अदा करावे लागेल. (विशेष प्रतिनिधी)
मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास १८० दिवस रजा
By admin | Published: March 16, 2017 4:05 AM