नवी मुंबई: महापालिकेने अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आपली कारवाई सुरूच ठेवली आहे. याअंतर्गत सोमवारी महापे एमआयडीसीतील जवळपास १८00 झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या २५ ते ३0 जणांची धरपकड केल्याचे महापालिकेडून कळविण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत महापालिका आणि सिडकोने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि झोपड्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महिन्यात दिघा परिसरातील शेकडो अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. तसेच यावेळी अनेक व्यावसायिक गोदामे, तबेले पाडून टाकण्यात आले. त्यानंतर सोमवारी महापे एमआयडीसीतील झोपड्यांवर बुलडोझर फिरविण्यात आला. यावेळी २0 मोठे गोडाऊनही जमीनदोस्त करण्यात आले. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त (शहर) अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई मोहीम राबविण्यात आली. या कारवाईसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)
महापे एमआयडीसीतील १८00 झोपड्या जमीनदोस्त
By admin | Published: March 07, 2017 2:32 AM