मुंबई : स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या राज्यभरात गेल्या दोन ते तीन दिवसांत वाढली आहे. रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात स्वाइन फ्लूचे सुमारे १८६ रुग्ण आढळले असून, ३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्रालयाच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. मुंबईत रविवारी स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळलेला नसून, रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत आलेल्या अहवालाप्रमाणे राज्यात स्वाइन फ्लूचे १८ नवीन रुग्ण आढळले आहेत. दोन दिवसांपूर्वीपर्यंत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या राज्यात १३५ इतकी होती. तर रविवारपर्यंत हा आकडा सुमारे १८६वर पोहोचलेला आहे. स्वाइन फ्लूमुळे राज्यात अजून ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ३८वर पोहोचली आहे. शनिवार, ७ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत आढळलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या १५ इतकी होती. रविवारी एकही रुग्ण आढळलेला नाही. (प्रतिनिधी)
राज्यभरात आढळले स्वाइन फ्लूचे १८६ रुग्ण
By admin | Published: February 09, 2015 5:54 AM