पुणे : महापालिकेच्या नागर वस्ती विकास विभागातील विविध योजना थेट लाभार्थींपर्यंत नेणाऱ्या सुमारे १८७ समूहसंघटिकांना कामावरून अचानक कमी करण्यात आले आहे. कंत्राटी तत्त्वावर गेली अनेक वर्षे हे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना वयाची अट दाखवून ब्रेक देण्यात आला आहे.असे करू नये, यासाठी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी मध्यस्थी केली आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनी याची दखल घेऊन वयाची अट दाखवून त्यांना कमी करण्यात येणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले होते. मात्र, नागर वस्ती विकास विभागाने त्याकडे दुर्लक्ष करीत या कर्मचाऱ्यांना ब्रेक दिला गेला. त्यामुळे आता त्यांच्यावर इतकी वर्षे काम करूनही ऐन उतारवयात बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.(प्रतिनिधी) हे सर्व कर्मचारी व्यवसाय गट, रिसोर्स पर्सन, समूह संघटिका, समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन अशा सुमारे १० पदांवरसन २००० पासून काम करतात. दर सहा महिन्यांनी त्यांना काही दिवसांचा ब्रेक दिला जातो व नंतर पुन्हा कामावर घेतले जाते. या वेळी मात्र त्यांना कामावरून कमीच करण्यात आले आहे, अशी तक्रार त्यांनी केली. नव्या नेमणुकांसाठी जाहिरात देण्यात आली आहे. समूहसंघटिका व समुपदेशिका या पदावरच्या नियुक्त्या केल्या जातील, अशी माहिती या विभागाचे प्रमुख संजय रांजणे यांनी दिली असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
नागर वस्ती विभागातील १८७ कर्मचारी बेरोजगार
By admin | Published: April 07, 2017 12:42 AM