मुंबई : इंधनाच्या किमतीतील प्रत्येक १ रुपया वाढीमागे राज्याला १७ कोटींचा जादा महसूल मिळतो. आॅगस्टमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात सरासरी ३ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे राज्याने एकाच महिन्यात १८९६ कोटी रुपयांची कमाई केली.महाराष्टÑात पेट्रोल व डिझेलवर ३९ टक्के कर आहे. राज्य सरकारला इंधनातून २०१६-१७ मध्ये १८,९७७ कोटी मिळाले. त्यावेळी इंधनाचे दर ६० ते ६५ होते. त्यानंतर २०१७-१८ मध्ये २२,६५२ कोटींचा महसूल राज्याला मिळाला या काळात इंधन दरात रोज वाढ होऊ लागली व राज्य सरकारला दमदार महसूल मिळाला. यंदा १ एप्रिल ते ३१ जुलै २०१८ या काळात इंधनातून ९०४०.५९ कोटी मिळाले. आॅगस्टमध्ये पेट्रोल २.८१ व डिझेल ३.५१ रुपयांनी महागल्याने राज्याच्या महसुलात मोठी वाढ झाली. १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट २०१८ दरम्यान या मिळालेला महसूल १०,९४४ कोटी असून तो उद्दिष्टापेक्षा १८५ कोटी अधिक आहे. अशीच दरवाढ होत राहिल्यास मार्च २०१९ अखेर राज्याच्या तिजोरीत मागीलवर्षीपेक्षा ५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पडेल.इतक्यात दिलासा अशक्य केंद्र सरकार उत्पादन शुल्कात कुठलीही कपात करण्याच्या मन:स्थितीत नाही. त्यामुळे वाढत्या पेट्रोल, डिझेलपासून सर्वसामान्यांना इतक्यात दिलासा मिळणे अशक्य आहे.केंद्र सरकार पुढील महिन्यात आंतरराष्टÑीय दरांचा अभ्यास करेल. त्यावेळी खनिज तेल ७५ डॉलर प्रति बॅरलवर असल्यास राज्य सरकारांना व्हॅटमध्ये कपात करण्याची सूचना केंद्राकडून दिली जाण्याची शक्यता आहे. पण स्वत:ची कमाई कमी करण्याची केंद्राची तयारी नाही, असे सूत्रांंनी सांगितले.
इंधन दरवाढीत राज्याने कमावले १८९६ कोटी; १ रुपया दरवाढीमागे मिळतात १७ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 6:23 AM