अतुल कुलकर्णी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे राज्यातील २८८ मतदारसंघांतून ९०० इच्छुकांचे अर्ज आले असून २९ जुलैपासून जिल्हास्तरावर मुलाखती होणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्ष गलितगात्र झाला आहे. त्यामुळे या पक्षाला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारही मिळणार नाहीत, अशी टीका भाजपचे नेते करत होते. मात्र इच्छुकांची संख्या लक्षात घेता गावपताळीवर काँग्रेसचे संघटन मजबूत असल्याचे सिद्ध होते. काँग्रेसमधून एकही कार्यकर्ता भाजप-शिवसेनेत जाण्यास तयार नाही, असेही थोरात म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मित्र पक्षांनाही सहभागी करून घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. सर्वांशी विचारविनिमय करूनच जागा वाटप आणि उमेदवार ठरविले जातील. २९, ३० आणि ३१ जुलै रोजी काँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आखण्यात आला असून मुलाखतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन निरीक्षक या प्रमाणे ७० निरीक्षक नेमण्यात आले आहेत. निरीक्षक आपला अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला सादर करतील. त्यानंतर राज्यस्तरीय कमिटीत त्यावर विचार केला जाईल, असेही थोरात यांनी सांगितले. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना राज्यात प्रचाराची मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.
लोकशाहीची गळचेपीलोकशाही पद्धतीने निवडून आलेले कर्नाटकमधील काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार अनैतिक पद्धतीने पाडून भाजपने लोकशाहीची गळचेपी केली आहे, अशी टीका थोरात यांनी केली आहे. ते म्हणाले की, भाजपने नैतिकता गुंडाळून ठेवली आहे. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवणे हेच मोदी शाह यांचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हे संपूर्ण देश गेल्या १५ दिवसांपासून पाहात आहे. हुकुमशाही मानसिकतेच्या भाजप नेत्यांचा विरोधी पक्षाचे सरकार चालू न देणे हा एकमेव अजेंडा आहे. याकरिता साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर सर्रास सुरु आहे.
दुष्काळ असताना मुख्यमंत्री प्रचारात!राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दौरा आखत आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुखांचे चिरंजीव आदित्य यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पडू लागली आहेत. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना अक्षरश: वाºयावर सोडून दिले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.