मुंबई : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर नाशिकमध्ये तीव्र पडसाद उमटले आणि ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनांत एसटीला मोठा फटका बसला. आंदोलनांत १९ एसटी बसची तोडफोड करतानाच त्यांची जाळपोळही करण्यात आल्याने आणि दोन दिवस एसटीच्या फेऱ्या बंद राहिल्याने ३ कोटींपेक्षा जास्त नुकसानाला सामोरे जावे लागले.
नाशिकमधील काही भागांत ९ आॅक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. यात मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या आंदोलनात एसटी बसच्या तोडफोडीबरोबरच जाळपोळही करण्यात आली. ९ आॅक्टोबर रोजी नऊ बसची तोडफोड करताना सात एसटी बसची जाळपोळही करण्यात आली होती. हा आकडा त्यानंतर आणखी वाढत गेला. एसटीच्या मुंबई ते नाशिक आणि त्यामार्गे जवळपास ५00 फेऱ्या होतात. मात्र सोमवारी व मंगळवारी फेऱ्याच झाल्या नाही; तर एसटीचा संपूर्ण नाशिक विभागच बंद ठेवण्यात आला. बुधवारपासून एसटी फेऱ्यांना हळूहळू सुरुवात झाली. फेऱ्या न झाल्याने एसटीचे दीड कोटीपेक्षा जास्त उत्पन्न बुडाले. (प्रतिनिधी)