आरवली : ग्रामदेवतेच्या होळीसाठी पौर्णिमेला ग्रामस्थ माड नेत असताना लोखंडी साकव तुटल्याने १९जण पडून जखमी झाले आहेत. त्यापैकी पाचजण गंभीर जखमी असून, त्यांना डेरवण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी खाचरवाडी-म्हापर्लेवाडी दरम्यान तुटल्याने घडली. सर्वत्र उत्साहात शिमगा सण साजरा होत असताना या घटनेनंतर एकच हाहाकार उडाला.कळंबुशी येथील खाचरवाडी ते बौद्धवाडी, म्हापर्लेवाडी या वाड्यांना जोडणारा लोखंडी साकव सन १९८० मध्ये जिल्हा परिषदेकडून बांधण्यात आला आहे. याच साकवावरून सुमारे ८० जण पौर्णिमेच्या होळीसाठी माड घेऊन निघाले होते. साकव २२ फूट लांबीचा आणि सहा फूट रुंदीचा आहे. हे सर्वजण साकवावर आले असता भार सहन न झाल्याने साकवाचा लोखंडी अँगल तुटला आणि साकव मधोमध तुटला. यामुळे सर्वजण साकवावरून सुमारे २० फूट खाली पऱ्यात एकमेकांवर कोसळले. काळोख होत चालल्यामुळे आणि होळीची वेळ जवळ येत असल्याने एकच तारांबळ उडाली.मंगेश सोमा फेफडे, संदीप राजाराम ठीक, अमोल अशोक चव्हाण, भालचंद्र प्रभाकर चव्हाण, रुपेश हरिश्चंद्र पाचकुडे, रुपेश सुहास डावूल, अक्षय अरुण चव्हाण, अजय रामचंद्र चव्हाण, शरद बाळकृष्ण चव्हाण, विनेश बाळकृष्ण चव्हाण, चंद्रकांत ठीक, प्रशांत तुकाराम काजवे, अमोल अनंत काजवे आणि साहील विजय आंबवकर हेही या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आरवली, माखजन आणि सावर्डे आदी ठिकाणी उपचार करण्यात आले. माखजन आणि आरवली परिसरात सगळीकडे मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात शिमगा सण साजरा होत असताना कळंबुशी येथील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे वृत्त कळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना मदतकार्य सुरू केले. (वार्ताहर)
साकव तुटल्याने १९ जखमी, ५ गंभीर
By admin | Published: March 14, 2017 7:32 AM