मुंबई, दि. 30 - मुंबईला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सर्वत्र हाहाकार उडवून देणा-या या पावसामुळे एकूण 19 जणांचा मृत्यू झाला असून, 16 जण जखमी झाले आहेत. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. या पावसामध्ये रेल्वेशी संबंधित दुर्घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून, 12 जण जखमी झाले आहेत.
काळा चौकी येथे लालबागच्या राजाच्या बंदोबस्ताला असणारा एक पोलीस कॉन्स्टेबल पाय घसरुन बॅरिकेडवर पडल्याने जखमी झाला. वीपी रोडवर राहणा-या विनीता शहा आणि त्यांची तीन मुले दुरुस्तीकामाचा ढिगारा त्यांच्या घरावर पडल्याने जखमी झाल्या. घाटकोपर येथे राहणारे रामेश्वर तिवारी (45) यांच्या घरावर स्लॅब कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी मंजू (34) आणि मुलगा क्रिष (9) दोघे जखमी झाले आहेत.
विक्रोळी पंचशील चाळ येथे राहणा-या निखील पाल या दोनवर्षीय मुलाचा दरड कोसळण्याच्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. पार्कसाईट येथे राहणारी कल्याणी गोपळ शंकर जंगम ही दोनवर्षांची मुलगीही दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मरण पावली. दहीसर आणि कांदिवली येथे नाल्यात वाहून गेल्याने प्रतीक सुनील (20) आणि ओमप्रकाश निर्मल (26) यांचा मृत्यू झाला. गणपती विसर्जनाच्यावेळी मढ जेट्टीवर रोहित कुमार चिन्नू (17) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
झाडाची फांदी अंगावर कोसळून इरला भिकू बामनीचा (40) जखमी झाल्या. नाल्यात बुडून एका 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. 30 वर्षीय वकिलाचा सायन येथे गाडीत अडकल्याने गुदमरुन मृत्यू झाला. ठाण्यात पावासाशी संबंधित वेगवेगळया दुर्घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. गौरी जयस्वाल ही 14 वर्षांची मुलगी अजूनही बेपत्ता आहे. राजीना शेख (32), शाहीद शेख (28) आणि गंगाराम बालगुडे (50) हे तिघे नाल्यात वाहून गेले. कळव्यामध्ये एक अज्ञात मृतदेह सापडला आहे.
आमच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याचे माझी पत्नी, आठ वर्षांचा मुलगा आणि गौरी घराबाहेर पडले. या दरम्यान गौरीचा पाय घसरुन ती नाल्यात पडली अशी माहिती अशोक जैस्वाल यांनी दिली. पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरु असताना तनिष्का बालशी ही पाचवर्षांची मुलगी वाहून गेली. राजेश नायर, जितेंद्र शर्मा आणि सुंदर झा हे सुद्धा वाहून गेले. झा यांचा मृतदेह अजून सापडलेला नाही.