मुंबई : मुंबई पालिकेच्या नायर रुग्णालयात प्रसूती झालेल्या १९२ महिलांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली. सुदैवाने त्यांनी जन्म दिलेल्या १९६ नवजात बाळांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. यापैकी १३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती रुग्णालयाने दिली.१९२ कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या गरोदर मातांनी १९६ बालकांना जन्म दिला. यात दोन जुळी आणि एकीला तिळी बाळे झाली. सर्व बाळांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.दरम्यान, नायर रुग्णालयात १४ एप्रिलपासून आतापर्यंत जवळपास ३२५ कोरोना पॉझिटिव्ह माता वेगवेगळ्या कारणांनी दाखल असून काहींची प्रसूती झाली आहे. काहींवर उपचार सुरू आहेत. वृद्ध, गर्भवती, दीर्घ आजार असणाऱ्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नायर रुग्णालयात जन्म घेतलेली बालके कोरोना निगेटिव्ह असल्याने डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.गर्भात संसर्ग होत नाहीबाळाची चाचणी निगेटिव्ह आली तरी नंतर हाताळताना ते पॉझिटिव्ह होऊ शकते. त्यामुळे बाळाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. गर्भात किंवा दूध प्यायल्यानंतर बाळाला संसर्ग होत नसल्याची माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली. दरम्यान, प्रसूतीवेळी डॉक्टरांकडून निर्देशित सूचनांप्रमाणे आवश्यक खबरदारी घेऊनच या मातांची प्रसूती करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
१९२ माता कोरोना पॉझिटिव्ह, पण जन्मलेली १९६ बाळे निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 5:44 AM