पुणे : आगामी ऊस गाळप हंगाम येत्या २० आॅक्टोबरपासून सुरु होत असून, त्यासाठी १९६ सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी अर्ज केला आहे. यंदा साडे नऊशे लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे. त्यामुळेच १ नोव्हेंबर ऐवजी ११ दिवस आधी हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी दिली. यंदा गाळपासाठी १०० सहकारी आणि ९६ खासगी कारखान्यांनी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षी ९.०५ लाख हेक्टर जमिनीवर ऊस लागवड झाली होती. तर त्यातून ९५३ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध झाला होता. तर, साखरेचे विक्रमी १०७ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा उसाचे क्षेत्र साडेअकरा लाख हेक्टरवर गेले आहे. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीचा ऊस गाळपाचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात पावसाने दिलेली ओढ, सोलापुर, औरंगाबाद आणि नगर येथे सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस आणि उसावर हुमणी रोग पडल्याने यंदा उत्पादकतेत घट होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी यावर्षी देखील साडेनऊशे लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. तर, साखरेचे उत्पादन १०५ लाख टन होईल असे सांगण्यात येत आहे. गाळपा अभावी ऊस शिल्लक राहू नये यासाठी गाळप हंगाम अलिकडे घेण्यात आला आहे.