जमीर काझी, मुंबईराज्य पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सध्या अस्वस्थता व मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या साडे सहा वर्षांमध्ये तब्बल १९७ पोलिसांनी आत्महत्या केल्या आहेत. यात अधिकाऱ्यांची संख्या ३५ आहे. गेल्या सहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते जून २०१६ अखेरपर्यंत दोघा अधिकाऱ्यांसह आठ जणांनी सेवेत असताना आयुष्य संपवले आहे. रविवारी पहाटे बोरीवली-चर्चगेट लोकलमध्ये महिलांच्या डब्यात बंदोबस्ताला असलेल्या कॉन्स्टेबल शिवाजी गायकवाडने मालाड आणि गोरेगाव स्टेशनच्या दरम्यान बंदुकीतून गोळी झाडत आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून वर्दीवाल्यांच्या ‘आॅनड्युटी’ आत्महत्यांचा तपशील मिळविला असता ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बहुतांश घटनांमागे बंदोबस्त, कामाचा ताण, वरिष्ठ सहकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक आणि कौटुंबिक कलह असल्याचे तपासातून पुढे आल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले.राज्यातील ११ कोटींहून अधिक नागरिकांच्या वित्त व जीविताच्या हमीसाठी २ लाखांवर पोलिसांचा फौजफाटा कार्यरत आहे. मात्र, खात्यांतर्गत सुंदोपसुंदी, गटबाजी वाढत आहे. अवेळी आणि सलग अनेक तास करावी लागणारी ड्युटी, विविध प्रकारचे बंदोबस्त, यामुळे साप्ताहिक सुट्टीवर येणारी गदा, वरिष्ठ अधिकाऱ्यांची मनमानी यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील मानसिक तणाव वाढत आहे. त्याचा परिणाम कुटुंबावर, वैयक्तिक जीवनावर होत आहे. कौटुंबिक कलह वाढल्याने आत्महत्या करण्याची मनोवृत्ती वाढली आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१० ते जून २०१६ या कालावधीत १९७ जणांनी आयुष्याचा अंत करून घेतला आहे. उपनिरीक्षक ते आयपीएस दर्जापर्यंतचे ३५ अधिकारी तर कॉन्स्टेबल ते सहायक फौजदारपदापर्यंतचे १६२ कर्मचारी यांनी जीवन संपवले आहे....तरच आत्महत्येचे प्रमाण घटेलवरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कौटुंबिक, वैयक्तिक अडीअडचणी लक्षात घेऊन त्या सोडविल्या पाहिजेत, त्यांच्यावरील कामाचा अतिरिक्त ताण, मानसिक त्रास कमी झाला तरच आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल, असे निवृत्त विशेष महानिरीक्षक डॉ. माधव सानप यांनी सांगितले.
साडेसहा वर्षांत १९७ पोलिसांच्या आत्महत्या
By admin | Published: August 08, 2016 5:19 AM