ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी मुस्तफा डोसाला फाशी देण्याची मागणी सीबीआयने न्यायालयात केली आहे. न्यायालयात आरोपींना काय शिक्षा द्यायची यावरुन युक्तिवाद सुरु असताना सीबीआयने मुस्तफा डोसाला फाशी देण्याची मागणी केली. सीबीआयने फक्त मुस्तफा डोसा नाही तर आरोपी फिरोज खानलाही फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 1993 च्या स्फोटातील मुख्य सुत्रधार याकूब मेमनइतकीच फिरोज खानचीही भूमिका महत्त्वाची होती असा दावा सीबीआयने केला आहे. विशेष टाडा न्यायालयात सध्या सुनावणी सुरु आहे.
मुंबई शहराला हादरवून सोडणा-या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले होते. गुन्हेगारी कट रचणे आणि दहशतवादी कारवायांसाठी सालेमला न्यायालयाने दोषी ठरवण्यात आले होते. शस्त्रास्त्र कायद्याखालीही न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने अब्दुल कय्यूमची सुटका केली. त्याची तात्काळ मुक्ततता करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते.
1993 Blasts Case: Prosecution asks for death penalty to Mustafa Dossa, before Special TADA Court,Mumbai— ANI (@ANI_news) June 27, 2017
12 मार्च 1993 रोजी 13 ठाकाणी झालेल्या शक्तिशाली साखळी बॉम्बस्फोटात 257 जण ठार तर 713 जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाला 24 वर्ष उलटून गेली आहेत. साखळी बॉम्बस्फोट घडवूण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला. यामध्ये एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कयूम यांचा समावेश आहे. या सर्वांवर आरोप निश्चित केले असून ते दोषी आहेत की नाही, याचा निकाल विशेष टाडा न्यायालयाने पुढे ढकलला आहे.
1993 Blasts Case: Prosecution asks for death penalty for Feroz Khan. CBI Counsel says that his role was parallel to that of Yakub Memon..— ANI (@ANI_news) June 27, 2017
साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार सुनावली आहे. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत.
सालेमने गुजरातला जाऊन नऊ एके-56 रायफल्स आणि 100 ग्रेनेडस घेतले. जानेवारी 1993 मध्ये अभिनेता संजय दत्त, झैबुनीसा काझीच्या घरी ही शस्त्रास्त्र उतरवण्यात आली होती. अनिस इब्राहिमच्या इशा-यावरुन ही शस्त्रास्त्रे या दोघांकडे ठेवण्यात आली होती. अबू सालेमला त्याच्या कृत्यासाठी फाशीची शिक्षा होऊ शकते पण पोर्तुगालकडून फाशीची शिक्षा न देण्याच्या अटीवर त्याचे प्रत्यर्पण झाले आहे.
हवाला ऑपरेटर राहिलेल्या ताहीर मर्चंटलाही न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी दोषी धरले. हल्ल्यासाठी ज्यांना प्रशिक्षित करण्यात आले त्यांच्यासाठी मर्चंटच्या दुबईमधील घराचा वापर झाल्याचे न्यायालयाने आपल्या निकाल वाचनात सांगितले होते.
न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी मुस्तफा डोसाला दोषी ठरवले आहे. कट रचण्यासाठी दुबईत झालेल्या बैठकीला मुस्तफा त्याचा भाऊ मोहम्मद डोसा आणि दाऊद इब्राहिमसह उपस्थित होता असे न्यायाधीशांनी सांगितले. शस्त्रास्त्र उतरवण्यासाठी मुस्तफा डोसाने मदत केल्याचेही सिद्ध झाले आहे.कोर्टामध्ये सर्व आरोपी त्यांच्यासाठी खास बनवण्यात आलेल्या बेंचवर शेवटच्या रांगेत बसले होते. निकालापूर्वी डोसाने आपण तणावामध्ये असल्याचे सांगितले होते.