लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास अखेर शिक्षण मंडळाला मुहूर्त मिळाला. २९ मे रोजी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार असून, सर्वसाधारणपणे १ जूनपासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी दिली. अकरावीची प्रवेश प्रक्रिया पारदर्शी व्हावी, विद्यार्थ्यांना गुणवत्तेवर महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून सेंट्रल पद्धतीने आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. यंदा आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी काम करणारी कंपनी बदलण्यात आली आहे. यामुळे आता प्रवेश प्रक्रियेत नक्की काय बदल होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गेल्या वर्षी २ मे रोजी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. पण, यंदा मे संपत आला तरीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नसल्याने विद्यार्थी - पालकांचा ताण वाढला होता. गेल्या आठवड्यापर्यंत आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पुस्तिका छापून झाल्या नव्हत्या. या पुस्तिकांची छपाई आता पूर्ण झाली आहे. सोमवारी या पुस्तिकांचे वाटप करण्यात येईल. या पुस्तिकांचे वाटप झाल्यावर २ ते ३ दिवसांत आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. आॅनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना दोन अर्ज भरावयाचे असतात. निकालाच्या आधी विद्यार्थी स्वत:ची प्राथमिक माहिती आणि अन्य गोष्टी भरू शकतात. निकालानंतर विद्यार्थी गुण आणि महाविद्यालयांविषयी अर्ज २मध्ये माहिती भरू शकतात. त्यामुळे निकालाच्या आधी प्रक्रिया सुरू झाल्यावर विद्यार्थी आणि शाळांवर ताण येत नसल्याचे शिक्षकांचे मत आहे.
अकरावी आॅनलाइन प्रवेशाला १ जूनचा मुहूर्त
By admin | Published: May 26, 2017 3:53 AM